कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती, न्यू पॅलेस, रंकाळ्यासह जुन्या कोल्हापूरच्या पारंपारिक पाऊलखुणा... या शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू. कोल्हापूरचे सौंदर्य ‘आपलं कोल्हापूर’ या दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत आहे. ही दिनदर्शिका जुन्या व ऐतिहासिक कोल्हापूरची स्मृती जागवत शाहूकालीन करवीरची सफर वाचकांना घडविणार आहे. परमाळे ग्रुप व ब्रँडशेफ अॅडव्हर्टायझिंग यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या अनोख्या ‘आपलं कोल्हापूर’ या प्रथम आवृती दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा उद्या, मंगळवारी होत आहे. हॉटेल केट्रीमध्ये सायंकाळी पाच वाजता श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांवर आधारलेल्या या दिनदर्शिकेमुळे नावीन्यपूर्ण आणि कलात्मक शहराची परंपरा अधोरेखित होण्यास मदत होईल.आपल्यासाठी दिवस आणि तारखेसह त्या दिवसाची वैशिष्ट्ये, सण-वार उत्सव, यात्रा, पंचांगापासून ते खाद्यपदार्थ अशा माहितीचा खजिना असलेल्या दिनदर्शिकेला व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धावपळीच्या या युगात दिवसातून किमान एकदा तरी त्यावरून नजर फिरवावीच लागते. अलीकडे खास विषयाला वाहिलेल्या उदाहरणार्थ आदर्श गृहिणी होण्यासाठीच्या टिप्स, पाककला, पंचांग, वास्तुशास्त्र यावर आधारित दिनदर्शिकाही काढल्या जातात, पण कोल्हापुरातील वैशिष्ट्यांवर आधारित दिनदर्शिका पहिल्यांदाच काढली जात आहे. अशाप्रकारचा हा अभिनव उपक्रम म्हणावा लागेल.या दिनदर्शिकेत कोल्हापूर शहरातील प्रमुख बारा वास्तूंची छायाचित्रे आणि त्यांची माहिती देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर राजर्षी शाहू महाराजांचे आकर्षक छायाचित्र आहे. शहरातील प्रमुख वास्तूंबरोबरच जुन्या संस्थान काळातील कोल्हापूरच्या खाणाखुणाही त्यात उमटतात. संस्थानकाळात परस्थ पाहुण्यांचे शहरात होणारे शाही स्वागत, प्रसिद्ध साठमारी, बग्गीतून सवारी, पूर्वीचे संस्थानकालीन रेल्वे स्टेशन, भवानी मंडप, शालिनी पॅलेस नसतानाचा रंकाळा अशा काही विस्मृतीत गेलेले गतचित्रे वाचकांना या दिनदर्शिकेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या दिनदर्शिकेमुळे कोल्हापूरकरांना या शहराची वैशिष्ट्ये नव्याने माहीत होणार आहेत, शिवाय पर्यटनवृद्धीसाठीही त्याचा उपयोग होणार आहे. ( प्रतिनिधी )कोल्हापुरातील प्रत्येक वास्तू आपल्याला एक इतिहास सांगते. मला पूर्वीपासूनच इतिहासाचा धांडोळा आणि जुन्या वास्तूंचा अभ्यास करण्याचा छंद आहे. या आवडीतूनच ही दिनदर्शिका साकारली आहे. यापुढे दरवर्षी या विषयाला वाहिलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाईल.- अभिजित परमाळे
‘आपलं कोल्हापूर’ दिनदर्शिकेवर
By admin | Published: December 29, 2014 11:30 PM