कोल्हापूर : सोन्याची बनावट बिस्किटे आणि गांजा विक्रीसाठी आलेला संशयित नारायण पाटील ऊर्फ सागर पाटील (वय ३१, रा. यादव गल्ली, कालकुंद्री, ता. चंदगड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. कागल तालुक्यातील कापशी ते लिंगनूर मार्गावर बाळीग्रे येथे सापळा रचून सोमवारी (दि. ७) दुपारी ही कारवाई करण्यात आली.गांजा आणि बनावट बिस्किटे पुरवणारा पुष्कर पाखले (मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. ग्रँट रोड, मुंबई) आणि विक्रीसाठी आलेला पाटील या दोघांवर मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.कापशी ते लिंगनूर मार्गावर एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी सापळा रचून पथकाने संशयित सागर पाटील याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो गांजा आणि बनावट सोन्याची दोन बिस्किटे मिळाली. चौकशीदरम्यान त्याने गांजा आणि बिस्किटे मुंबईतील पुष्कर पाखले याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या संशयिताचाही शोध सुरूगांजा आणि बनावट बिस्किटे पुरवणारा मुंबईतील पुष्कर पाखले याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. संशयितांनी सोन्याची बनावट बिस्किटे देऊन काही लोकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले.