पोर्ले तर्फ ठाणे : कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रातून लस वाटपात दुजाभाव होतो. त्यामुळे पोर्ले तर्फ ठाणे परिसरातील लसीकरणात होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ युवकांनी कोविड सेंटर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटला टाळे ठोकून प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी पोर्ले केंद्रात ताबडतोब १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी गेटचे टाळे काढून रुग्णांचा मार्ग मोकळा केला. लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासन लसीकरणाच्या दिरंगाईबाबत पाठपुरावा करत नसल्याची खंत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
गेले महिनापासून लसीकरणाचा तुटवडा आणि पोर्ले आरोग्य केंद्रात लस ठेवण्यासाठी फ्रिजर नसल्याचे कारण सांगत आरोग्य विभाग लस उपलब्धतेसाठी चालढकल करत आहे. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन आणि केंद्रावर वादंगाचे प्रकार घडत आहे. तर आरोग्य अधिकारी लसीकरणाबाबत हात वर करत आहेत. लसीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आठवडाभर लस मिळत नसल्याच्या रागातून पोर्ले गावातील काही युवकांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी कोविड सेंटर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करत तासभर रुग्णांना वेठीस धरले. त्यांनतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने तूर्तास १५० डोस आणि उपलब्धतेनुसार लसीचे डोस वाटप करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राजेश शिंदे, सचिन चेचर, भरत शिंदे, बबलू चौगुले, विश्वजित साळोखे, रोहित पाटील, प्रकाश काशीद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण वाटपात प्रशासनाची दमछाक होत आहे. पोर्ले प्राथमिक केंद्रांत फ्रिझर नसल्याने लस ठेवता येत नाही. कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली पोर्ले परिसराला लस पुरवली जाते. आज दीडशे डोस दिले जातील आणि येथून पुढे लस वाटपात दिरंगाई होणार नाही.
- हंबीरराव पाटील, सभापती, जिल्हा परिषद आरोग्य विभाग