नेसरी : अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून लाथ मारल्यामुळे मद्यपी तरुणाचा मृत्यू झाला. अशोक गणेश जामुने (वय ३६, रा. मातंग गल्ली, नेसरी), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अरमान मलिकजान बागवान (वय २८, रविवार पेठ, नेसरी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २६) उघडकीस आली.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री अशोक जामुने हा मद्य प्राशन करून पायी चालत जात होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याला पाठीमागून कमरेत लाथ मारल्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. त्यानंतर उठून पुन्हा चालत पुढे जाताना त्याने पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर लाथा मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून अरमान यानेच अशोकला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मारहाणीची कबुली दिली.अशोक हा अविवाहित होता. त्याचा भाऊ राजेशच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आबा गाढवे अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी भेट दिली.
‘सीसीटीव्ही’मुळे उलगडाअशोक हा मातंग गल्ली समाजाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दारू पिऊन रस्त्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, परिसरातील भैरवनाथ भेळ या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून अवघ्या १२ तासांत त्याच्या खुनाचा उलगडा झाला.