शिरोली : स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कंपनीवर फडकवलेला तिरंगा ध्वज काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा ३५ फुटावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना काल, मंगळवारी दुपारी शिरोली येथे घडली. नरेशसिंह पुनमसिंह चौहान (वय.१८,रा.श्रीमार्बल सेंटर, शिरोली सांगली फाटा,मुळगाव करालीया, जिल्हा पाली, राजस्थान) असे मृताचे नाव आहे.नरेशसिंह चौहान हा आपले आई वडील, एक भाऊ यांच्या सोबत गेल्या चार वर्षांपासून शिरोली सांगली फाटा येथे राहण्यास आहे. येथील श्रीमार्बल सेंटर येथे तो कामाला होता. या सेंटरच्या इमारतीवर ध्वज फडकवला होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास नरेशसिंह चौहान हा ध्वज उतरवण्यासाठी कंपनीच्या इमारतीवर चढला.
ध्वज उतरुन परत येताना नरेशसिंह ३५ फुटांवरुन खाली इमारतीच्या प्लॅस्टिक पत्र्यातुन खाली पडला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.