कोल्हापूर : महिन्याचा पगार झाला, आई-वडिलांना पैसे पाठवायची म्हणून त्याची केवढी धावपळ; परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. बँकेत पगार जमा करण्यास जातानाच त्याला भरधाव वाहनाने उडवले व गुरुवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. पगाराचे पाकीट त्याच्या खिशातच राहिले. गावाहून येण्यास तीन दिवस लागत असल्याने आई-वडिलाना अंत्यदर्शनही घेता आले नाही. त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.टीचभर पोटासाठी दोन हजार किलोमीटर लांब आलेल्या बिहारमधील तरुणाची ही दुर्दैवी कथा आहे. सोनूकुमारचे गाव बिहारमधील सिस्टोला (जि. कटिहार) आहे. बांगलादेशाच्या सीमेजवळ हा जिल्हा येतो. प्रवास करायचा तर तीन दिवस लागतात. एवढ्या लांबून येऊन तो आठ-दहा हजारांवर बिगारीची कामे करीत होता. घरी आई-वडील, तीन भाऊ, तीन बहिणी. गरिबीमुळे तो वयाची १८ वर्षे पूर्ण होताच कागल पंचतारांकित कंपनीत कष्टाची कामे करण्यासाठी आला. गुरुवारी तो आणि त्याचा सहकारी पंकज कुमार हे पगाराचे पैसे घरी पाठविण्यासाठी दुचाकीवरून जवाहर साखर कारखान्याकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेली मोटार आणि दुचाकी यामध्ये धडक झाली. यात सोनूकुमार आणि मागे बसलेला पंकजकुमार हे दोघेही गंभीर जखमी झाले. सोनुकूमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत्यूचे वृत्त आई, वडिलांना मोबाइलवरून सांगण्यात आले. मात्र, तेथून येण्यास विलंब लागणार असल्याने येथेच त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. पगार झाला आहे, संध्याकाळपर्यंत पैसे मिळतील, असे कुटुंबीयांना सांगितलेल्या सोनूकुमारचा चटका लावणारा मृत्यू झाला. धडधाकट मुलगा कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून रोजगार शोधत आला; परंतु तो पुन्हा मागे गेलाच नाही.