कोल्हापूर : बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथे नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल नाचवून स्टंट करणारा रोहित राजू दंडगल (वय २१, रा. दौलतनगर, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १७) उजळाईवाडी येथून अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले असून, पिस्तूल विक्रेत्याचा शोध सुरू आहे.दौलतनगरातील रोहित दंडगल हा ९ ऑगस्टला बत्तीस शिराळा येथील नागपंचमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. मिरवणुकीत त्याच्या काही मित्रांचा दुसऱ्या तरुणांशी वाद झाला. त्यावेळी दंडगल याने कमरेचे पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेचा व्हिडीओ सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना मिळाला होता. निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पथकाने व्हिडीओची पडताळणी केली असता, पिस्तूल नाचवणारा संशयित हा रोहित दंडगल असल्याची खात्री पटली. पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने शनिवारी दुपारी उजळाईवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्याला अटक केली. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल मिळाले.त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अंमलदार अमित सर्जे, विनायक चौगुले, प्रवीण पाटील आणि कृष्णात पिंगळे यांनी कारवाई केली.
बिहारी तरुणाकडून पिस्तुलाची खरेदी?अटकेतील रोहित दंडगल याची काही गुन्हेगारांसोबत ऊठबस आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील एका बिहारी तरुणाकडून पिस्तुलाची खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याची खात्री करण्यासाठी पोलिस बिहारी तरुणाचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधानंतर पिस्तूल तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.