पद : मॅनेजिंग डायरेक्टर, केदार मोटर्स, कोल्हापूर
इलेक्ट्रिकल्स बाइक्स क्षेत्रात ठमा उमटविणाऱ्या ‘नम्रता’
सासरच्या घरचा पारंपरिक सुवर्ण कारागिरीचा व्यवसाय; मात्र पती योगेश यादव यांनी एकदम इलेक्ट्रिककल्स बाइक्सच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याची अचानक आलेल्या जबाबदारीने गोंधळून जाण्यापेक्षा त्यांनी संधीचा स्वीकार केला आणि त्याचं सोनंही करून दाखवलं. कोणताही पूर्वानुभव नसतानादेखील आत्मविश्वास, कष्टाच्या जोरावर अल्पावधीत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत कोल्हापूरच्या वाहन उद्योगातील एका वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याची उल्लेखनीय कामगिरी केदार मोटर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर नम्रता योगेश यादव यांनी केली आहे.
नम्रता यांचे माहेर आडूर (ता. करवीर), तर सासर कोल्हापुरातील मंगळवार पेठेमधील गुलाब गल्ली आहे. आडूरमध्ये त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर बी.ए.ची पदवी घेऊन पुढे एम.ए (समाजशास्त्र) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात असताना सन २००५ मध्ये त्यांचा कोल्हापुरातील सुवर्ण कारागीर योगेश यादव यांच्याशी विवाह झाला. पुढे त्या संसारामध्ये रमल्या. मुलगा ज्योतिरादित्य आणि मुलगी संस्कृती शाळेत जाऊ लागल्याने घरातील दैनंदिन कामे आवरून त्यांच्याकडे बराच वेळ शिल्लक राहू लागला. सुवर्ण कारागीर, सोनार काम हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांची श्री महालक्ष्मी ज्वेलर्स ही फर्म योगेश यांचे आजोबा रघुनाथ यादव यांनी सुरू केली. वडील गजानन आणि योगेश व त्यांचे भाऊ रोहित यांनी वाढविली. नम्रता यांना एखादा व्यवसाय सुरू करून देण्याचा विचार योगेश यांच्या मनात आला. त्यांनी यादृष्टीने विचार सुरू केला. त्यावेळी पेट्रोलचे वाढते दर आणि पर्यावरण रक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी इलेक्ट्रिकल बाइक्सच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून कोल्हापुरातील उमा टॉकीज परिसरात ऑक्टोबर २०२०मध्ये केदार मोटर्सची सुरुवात केली. या फर्मच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदाची जबाबदारी नम्रता यांच्यावर सोपविली. पती योगेश यांचे मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या साथीने त्या कार्यरत झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलपंप बंद असल्याने आणि स्वत:च्या दुचाकीचे महत्त्व पटल्याने पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिकल्स बाइकची मागणी वाढली, या संधीत नम्रता यांनी व्यवसाय वाढविला.
कसबा बावडा, कुडित्रे फॅक्टरी, आजरा, इचलकरंजी याठिकाणी सहवितरक नेमले. केदार मोटर्स आणि सहवितरकांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत तीनशे एएमओ इलेक्ट्रिकल्स बाइक्सची विक्री केली आहे. त्यात लीड, लिथिनियम बँटरीमधील आणि ५० ते १२० किलोमीटर अव्हरेज देणाऱ्या जॉन्टी, इन्पारस, फेपटी, फेस्टी या प्रकारातील एएमओ इलेक्ट्रिकल बाइक्सचा समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीत कर्तव्य निभावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, महानगरपालिकेतील कर्मचारी आदींसाठी या बाइक्स मदतगार ठरल्या. या बाइक्सची केवळ विक्रीच नव्हे तर त्यासह मोबिलिटी आणि इतर कंपन्यांच्या बाइक्ससाठी सर्व्हिसिंग सेंटरच्या माध्यमातून सेवा देण्याची सुविधाही सुरू केली. या सेवेबद्दल त्यांचे ग्राहकदेखील समाधानी आहेत.
आता या इलेक्ट्रिकल्स बाइक्सचे आरटीओ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सबसिडी (अनुदान) मिळणार आहे. त्यामुळे सध्या ५५ ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या बाइक्सची किंमत कमी होणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील विविध परिसरातील ग्राहकांना या बाइक्सची विक्री करण्यासह विक्री पश्चात सेवा पुरविण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये केदार मोटर्सची शाखा सुरू करण्याचे ध्येय ठेवून नम्रता या कार्यरत आहेत. व्यवसाय क्षेत्रातील त्यांची वाटचाल आदर्शवत ठरणारी आहे.
चौकट
नवनवीन पाककृतींची आवड!
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा यांच्यावर नम्रता यादव यांची श्रद्धा आहे. धार्मिक वृत्तीच्या असलेल्या नम्रता यांना नवनवीन पाककृतींची आवड आहे. कुटुंबीयांना त्या नेहमी नवनवीन पदार्थ करून खाऊ घालतात. पूरग्रस्तांना त्यांनी जेवण पुरविण्यासह मदतीचा हात दिला आहे. जोतिबा यात्रेवेळी पंचगंगा तालमीच्या वतीने आयोजित महाप्रसादावेळी आणि जोतिबा देवाच्या प्रकट दिनाच्या उत्सवामध्ये त्यांचे चांगले योगदान असते.
चौकट
आत्मविश्वासाने कार्यरत राहावे
व्यवसाय क्षेत्रातील कोणताही अनुभव नव्हता. मात्र, पती व कुटुंबीयांचे पाठबळ आणि कर्मचाऱ्यांच्या साथीने कार्यरत राहून एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले. यशस्वी झाले. सुरुवातीला काही अडचणी आल्या. मात्र, आत्मविश्वासाने त्यांचा सामना केला. नोकरी, व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रात महिलांनी आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. मी हे करू शकणार नाही. मला हे जमणार नाही असे नकारात्मक विचार बाजूला करावेत. आवड लक्षात घेऊन व्यवसाय करावा. त्यात निश्चितपणे यश मिळेल, असा सल्ला नम्रता यांनी महिला, युवतींना दिला.