लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीघाटावर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका युवकाने पुलावरून नदीत उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. यावेळी पुलावरून ये-जा करणाºया नागरिकांची गर्दी जमली होती. तेवढ्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी यांत्रिक बोटींच्या साहाय्याने नदीत बुडणा-या युवकाला वाचविले. परंतु पालिकेच्यावतीने महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इचलकरंजी नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने महापूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारी यंत्रणा व यांत्रिक बोटींचे नदीपात्रात शुक्रवारी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना नगरपालिकेचे संजय कांबळे यांनी महापुरातील आपत्ती व्यवस्थापनातील कार्य व साहित्य यासंबंधी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की, पालिका प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. महापुराच्या काळात पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. महापुराच्या काळात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थितीपूर्व नियोजनामुळे हाताळणे सोपे जाते. त्यासाठी आतापासूनच पालिकेची यंत्रणा सज्ज होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नदीघाटावर प्रात्यक्षीक घेण्यात आले. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जवान व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकटी
आपत्ती व्यवस्थापनातील उपलब्ध साहित्य
यांत्रिक बोट, साधी बोट, लाईफ जॅकेट, लाईफरिंग्ज, दोर, मेगा फोन, गळ, इनर, इमर्जन्सी लॅम्प, स्लायडिंग शिडी, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट्स, मोठे टॉर्च, दुर्बिण, कटर, आग विझविण्याची सामग्री, आदी साहित्य आपत्ती व्यवस्थापनात सज्ज ठेवण्यात आले आहे.
अनेक पथके तैनात
इचलकरंजी नगरपरिषद आपत्कालीन पथक, इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्था, वीर रेस्क्यू फोर्स, तेज्योनिधी रेस्क्यू फोर्स, नगरपालिकेचे पथक, अग्निशमन दल यांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
फोटो ओळी
०४०६२०२१-आयसीएच-०१
पंचगंगा नदीत प्रात्यक्षिक सादर करताना जवान.
०४०६२०२१-आयसीएच-०२
पंचगंगा नदीघाटावर महापूर आपत्ती व्यवस्थापनंबंधी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगराध्यक्षा अलका स्वामी, सभापती उदयसिंह पाटील यांना पालिकेचे संजय कांबळे यांनी माहिती दिली.