कुंभोज : माणुसकी हरवत चालली आहे, प्रामाणिकपणा तर आता कुठे उरलाय इथंपासून ते हल्लीचे तरुण पुरते दिशाहीन झालेत अशी शेरेबाजी अनेकांच्या तोंडून सहजपणे अनेकदा ऐकायला मिळते. मात्र, कुंभोज, ता. हातकणंगले येथील तरुणांनी तर अपघातग्रस्त महिलांना मदत करून माणुसकीचा धडा दिला तसेच अपघातस्थळी पडलेले त्या महिलांचे सत्तर हजार रुपये परत करून प्रामाणिकपणाचा आदर्शही निर्माण केला.
कुंभोज-दानोळी मळ्याशेजारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मिरजेस चाललेल्या दोन महिला जखमी झाल्या. अपघाताची माहिती समजताच कौस्तुभ माळी, वैभव कोळी, हणमंत मिसाळ, दगडू कांबळे, सुरेश घोरपडे या तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्वतःच्या चारचाकी गाडीतून जखमी अवस्थेतील महिलांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार झाले. शिवाय त्या महिलांचे अपघातस्थळी पडलेले सत्तर हजार रुपयेे कुुुुटुंंबीयांकडेे प्रामाणिकपणे परत केलेे. एव्हाना अपघात घडला की पाठम्होरे होणाऱ्यांची संख्या कमी नसताना पाच तरुणांनी दाखविलेल्या माणुसकी तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे कुुंभोज परिसरात कौतुक होत आहे.