- एकनाथ पाटील कोल्हापूर - मोबाईलवरील पबजी गेमचा खेळ महाविद्यालयीन तरुणाच्या जिवावर बेतण्याचा प्रयत्न झाला. इंद्रजित बजरंग कोळी (वय २०, रा. पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. तो प्रचंड मानसिक तणावाखाली असून त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु तो काही तासातचं तेथून घरी निघून गेला. तो रुग्णालयात दाखल झालेला व्हिडीओ शनिवारी दिवसभर वॉटसॅअप, सोशल मिडीयावर फिरल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. अधिक माहिती अशी, इंद्रजित कोळी हा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. काही महिन्यापासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. एकटाच बंद खोलीत बसून राहत असे. अचानक आरडाओरड करु लागल्याने त्याच्या आई-वडीलांनी त्याला शुक्रवारी (दि. १३) सीपीआरमध्ये उपचारासाठी आनले. येथील अपघात विभागात बेडवर झोपले असता तो मोठ्याने ओरडत होता. त्याला आई-वडीलांनी पकडून ठेवले होते. त्याचे डोळे पूर्णत: झाकले होते. मित्रांनी त्याला काहीतरी औषध पाजलेची शंका पुढे आल्याने त्या सर्वांना सीपीआरमध्ये बोलवले.त्यांनी तो कोर्ल्डींक पिल्याचे सांगितले. तो सतत मोबाईलवर पबजी गेम खेळत असायचा. दूसरे काहीच तो करीत नसे, मोबाईल काढून घेतला तर तो आई-वडीलांशी वादावादी करीत असे. वेड्यासारखे तो करु लागल्याने भितीने आई-वडीलांनी त्याला सीपीआरमध्ये आनले. याठिकाणी तो काहीच बोलत नव्हता. डॉक्टरांनी त्याचे डोळे तपासून उपचार केले. तो मानसिक तणावाखाली असून दाखल करुन घेण्यास सांगितले असता तो काही तासाने तेथून घरी निघून गेला. पबजी गेमचा त्याच्या मेंदूवर परिणाम झाला असून तो स्वत:च बडबडत असतो.समोरच्या व्यक्तिचे तो काहीच ऐकून घेत नाही. मानोसउपचार तज्ज्ञांकडून त्याचेवर उपचार करण्याची गरज आहे. अन्यथा पबजी गेमचा खेळ त्याच्या जिवावर बेतू शकतो. आई-वडील शेतकरी कुटूंबातील असून घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्याचेवर योग्य वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
कोल्हापुरात पबजीमुळे तरुण अत्यवस्थ,
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 9:41 PM