गडहिंग्लज : लग्नासाठी मुलगी बघायला दुचाकीवरून गावी येणाऱ्या तरुणाला काळाने वाटतेच गाठले. बंगळुरूहून गडहिंग्लजला येणाऱ्या आशिष वामन सुतार (वय ३३, रा.भगतसिंग रोड, गडहिंग्लज) याचा हुबळीनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (२८) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, आशिष याचे कुटुंबीय मूळचे आजरा तालुक्यातील कानोलीचे रहिवासी होत. गेल्या काही वर्षांपासून ते गडहिंग्लजमध्ये स्थायिक झाले आहेत. आशिष हा बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत होता. कुटुंबीयांनी यंदा त्याच्या विवाहाचा बेत आखला होता. रविवारी एक स्थळ पाहण्याच्या निमित्ताने तो दुचाकीवरून गडहिंग्लजला येत होता. हुबळीनजीक सकाळी त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच्यापश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.दरम्यान, सोमवारी सायंकाळी हुबळीहून त्याचा मृतदेह गडहिंग्लज येथील राहत्या घरी आणण्यात आला. त्यानंतर, रात्री मूळगावी कानोली येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबीयांना धक्का..!आशिषने ‘कमर्शियल आर्ट्स’ची पदव्युत्तर पदवी घेतली होती. बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत तो सीनिअर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून नोकरीला होता. त्याला प्रवास, फोटोग्राफी व ट्रेकिंगचा छंद होता. कमावत्या मुलाच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
स्वत:च दिली अपघाताची माहितीराष्ट्रीय महामार्गावर हुबळीनजीक धावती दुचाकी स्लीप झाल्याने आशिष खाली पडला. त्यानंतर त्याने स्वत: फोन करून घरच्यांना आपला अपघात झाल्याची माहिती दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.