महाडिकांची युवा शक्ती माझ्याविरोधातच : बंद खोलीतील चर्चेत ‘पी. एन.’ यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:02 AM2019-03-25T11:02:40+5:302019-03-25T11:06:51+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा आणि विधानसभेवेळी महाडिक यांची युवा आघाडी कोणाच्या पाठीशी असते? अशी विचारणा ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा आणि विधानसभेवेळी महाडिक यांची युवा आघाडी कोणाच्या पाठीशी असते? अशी विचारणा करीत कॉँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी गेल्या काही वर्षांतील संतापाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर वाट करून दिली.
आम्ही प्रामाणिकपणे काम करीत असताना ‘गोकुळ’च्या नोकरभरतीत विरोधकांच्या मुलांना का घेतले जाते? असा आरोप त्यांनी यावेळी केला. प्रकाश आवाडे यांनीही महाडिकविरोधी सूर आळवल्याने कॉँग्रेस कमिटीतील बंद खोलीतील वातावरण चांगलेच तापले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन्ही कॉँग्रेस नेत्यांचा समेट घडवून आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी कॉँग्रेस कमिटीत जाऊन कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी पाऊण तास बंद खोलीत चर्चा केली. यामध्ये पाटील यांनी राष्ट्रवादी व महाडिकविरोधी तक्रारींचा पाढाच वाचत मनातील खदखद जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.
पी. एन. पाटील म्हणाले, आम्ही कॉँग्रेस सोडून कधी वेगळा विचार केला नाही. सदाशिवराव मंडलिक, संभाजीराजे आणि धनंजय महाडिक यांना आघाडीचे उमेदवार म्हणून प्रत्येक वेळा मताधिक्य दिले; पण विधानसभेला राष्ट्रवादी कॉँग्रेस आमच्या उलटे काम करते, हा इतिहास आहे.
धनंजय महाडिक यांची युवाशक्तीही स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देते. युवा शक्ती कोणाचे काम करते? ‘गोकुळ’च्या नोकरभरतीत विरोधकांच्या मुलांना कोणी घेतले? असा सवाल करीत, आम्हाला कॉँग्रेस पक्षाचा आदेश आलेला आहे, त्यास अधीन राहून आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार प्रामाणिकपणे करणार आहोत; पण कार्यकर्ते कितपत ऐकतील हे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी सांगून टाकले.
प्रकाश आवाडे यांनीही पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. गेल्यावेळीही लोकसभेला महाडिक यांना मदत करण्यात आली. मात्र नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता परत कार्यक र्त्यांसमोर काय सांगायला जायचे, असा सवाल आवाडे यांनी उपस्थित केला.
यावेळी महाडिक यांनी यापुढे अशा चुका होणार नसल्याचे सांगितल्याचे समजते. बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, धनंजय महाडिक, ए. वाय. पाटील, प्रकाश सातपुते उपस्थित होते.
आताही २४ तारखेला आमच्याविरोधात सभा घ्या
गेल्या लोकसभा निवडणुकीत आपली प्रकृती बरी नसतानाही ताकदीने काम करून ३५ हजारांचे मताधिक्य दिले आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी परिते येथे सभा घेऊन शिवसेनेच्या आमदाराच्या कामाचे कौतुक करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आताही लोकसभेचे मतदान २३ एप्रिलला संपते. लगेच दुसऱ्या दिवशी आमच्याविरोधात सभा घ्या, असा संताप पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.
प्रचार न करण्यास आता जयंतराव, तुम्ही सांगा!
विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी आपला प्रचार केला नसल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावर, अरुण गुजराथी यांनी प्रचाराला जाऊ नका, असा निरोप दिल्याचे महाडिक यांनी सांगितले. ‘त्यावेळी गुजराथी यांनी सांगितले, आता जयंतराव, तुम्ही सांगा!’ असा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला.