कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी रोज घंटागाडी प्रत्येक गल्लीत येते. कचरा संकलित केला जातो. तरीही कचरा घंटागाडीत न टाकता तो कोंडाळ्यातच टाकला जातो; म्हणून पालिकेने फलक लावले तरीही लोक ऐकत नसल्याने आता कोंडाळामुक्त लाईन बझारसाठी तरुणाई सरसावली आहे.लाईन बझार परिसरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घंटागाडी येऊन कचरा गोळा करून जाते. तरीही काही नागरिक कचरा हा घंटागाडीत न टाकता तो रात्रीच्या वेळी कोंडाळ्यातच आणून टाकतात. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने कोंडाळ्याच्या ठिकाणी आवाहनवजा कारवाई करण्याचे फलक लावले आहेत. तरीही नागरिक त्या फलकाखाली कचरा टाकतातच.
आता पालिकेने आणखी काय करायचं असा प्रश्न भागातील तरुण वर्गाला पडतं आहे. यामुळे भागातील पद्माराजे स्पोर्टिंग व शिवप्रेमी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला असून या ठिकाणी पालिकेच्या मदतीने कचरा उठाव करून नगरसेविका माधुरी लाड व स्वाती येवलुजे याच्या सहकार्याने कोंडाळ्याच्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडी व झाडे लावण्यात आली आहेत.हा कचरा कोंडाळा सेवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर येत असून या ठिकाणाहून रोज असंख्य रुग्ण ये-जा करीत असतात; यामुळे कचरा टाकू नये यासाठी अनेक वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाले; मात्र रात्रीच्या वेळी फिरायला येणारे नागरिक कचरा टाकून जातात. त्यामुळे दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हा परिसर बसण्यासाठी बाकडी व झाडे लावून सुशोभित करण्याचे ठरवले. त्यानुसार सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे.----------------------------कॅमेऱ्याची नजरइतके प्रयत्न पालिकेच्या वतीने करून आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगूनही कचरा टाकला जातच होता. आता इतका परिसर स्वच्छ करूनही कोणी त्या ठिकाणी कचरा टाकला तरी ती व्यक्ती समजावी म्हणून तिथे कॅमेरा बसवला जाणार आहे.------------------------------आपला परिसर आपण स्वच्छ ठेऊ.सध्या कोल्हापूर शहरामध्ये पालिकेच्या वतीने कचरामुक्त शहर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. यासाठी जागोजागी असणारे कचरा कोंडाळे उचलण्यात आले आहेत व तिथे कारवाई करण्याबद्दलचे फलक लावले आहेत; तरीही तिथे कचरा टाकला जात आहे. तरी आपण राहत असलेला परिसर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे, असे आवाहन दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले.---------------------फोटो ओळी.कोल्हापुरातील लाईन बझार येथील पद्माराजे स्पोर्टिंग व शिवप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने सेवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात असणारा कचरा कोंडाळा हटवून हा परिसर सुशोभित करण्यात येत आहे. (छाया -दीपक जाधव ).