इस्लामपूर : माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्याच्या पोटात निर्माण होतात; मात्र हेच मोती शेतात पिकविता येतात, असे जर कोणी सांगितले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु ही किमया साधली आहे साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील या युवकाने!दिग्विजय स्थापत्य अभियंता आहे. त्याने तीन वर्षे गृहनिर्माण विभागात सरकारी नोकरीही केली; मात्र ओढा नोकरीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय-उद्योगाकडे होता. नोकरीत असतानाच त्याला माहिती मिळाली की नाशिक येथे गोड्या पाण्यात मोती पालन शेती केली जात आहे. नाशिक येथे जाऊन ते पाहिले आणि प्रशिक्षणही घेतले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील अचल सिंग ‘ग्लिटराटी पर्ल फार्म’ या नावाने देशात काही ठिकाणी मोती पालन शेती (पर्ल फार्मिंग) करतात. ते प्रशिक्षण आणि उत्पादनाच्या खरेदीची ग्वाही देत प्रकल्प उभारणी करून देतात. दिग्विजयने त्यांच्याशी संपर्क साधला आणि ‘मोती पालन शेती’ साकारली.दिग्विजयचे मामा रणजित देसाई येडूर (कर्नाटक) येथे राहतात. त्यांच्या सात भावांची एका ठिकाणी १२५ एकर शेती असून, यामध्ये सात एकर ग्रीन हाऊस आहे. त्यासाठी त्यांनी ८० बाय १२० चे आणि २५ फूट खोल शेततळे बांधले असून, यामध्ये मासे उत्पादनही घेत आहेत. या शेतातील मोटारी चालविण्यासाठी त्यांनी १५ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे दिग्विजयने मोती पालनाचा प्रकल्प येडूर येथेच उभा केला.तो म्हणाला, पर्ल फार्मिंगमध्ये गोड्या पाण्याचे शेततळे आवश्यक आहे. हा खर्च एकदाच करावा लागणार आहे. मात्र पाण्याचा दर्जा महत्त्वाचा आहे. मामांचे शेततळे तयार असल्यामुळे आम्हास हा खर्च करावा लागला नाही. याव्यतिरिक्त शिंपले (मुस्सेल्स), न्यूक्लिअस (शिंपल्यात सोडण्यात येणारी डिझाईन), शिंपल्यामध्ये न्यूक्लिअस सोडणे (आॅपरेशन कॉस्ट), नायलॉन दोर, बांबू आदी खर्च करावा लागला आहे. आम्ही २० हजार शिंपले तळ्यात सोडले असून, प्रत्येक शिंपल्यात दोन न्यूक्लिअस घातले आहेत. अगदी ५० टक्के उत्पादन म्हटले तरी १० हजार शिंपल्यातून २० हजार मोती मिळतील. प्रत्येक मोत्यास १०० रुपयेप्रमाणे बाय बॅक करार (तयार झालेले मोती विकत घेण्याची हमी) झाला आहे. १८ ते २० लाखांचे उत्पन्न मिळू शकते. कमीत कमी ५००० शिंपल्यापासूनही सुरुवात करता येऊ शकते. त्यासाठी कमीत कमी ४० फूट रुंद, ६० फूट लांब आणि १२ फूट खोल शेततळे असले पाहिजे. येत्या जुलैमध्ये शेतकरी, युवकांना मोती पालन शेतीबाबतचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
युवकाने साकारली मोती पालन शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:28 AM