कोल्हापूर : महापालिका गेटजवळ भरदिवसा कोणतेही कारण नसताना कंपनीच्या विक्री प्रतिनिधीस एकाने डोक्यात बाटली मारून जखमी केले. या बाबतची फिर्याद ओमकार जयवंत पाडळकर (वय १९,रा. कुंभार गल्ली, पापाची तिकटी) याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आदित्य शंकर माने (रा. जोशी गल्ली) असे आहे.
महापालिका मुख्य गेटजवळ ओमकार हा एका सेव्हिंग कंपनीची किट छत्री लावून विकतो. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारण नसताना संशयित माने याने फिर्यादी जवळ येत डोक्यास व हातास बियरची बाटली मारून जखमी केले. यावेळी महापालिका गेटच्या बाहेर ये-जा करणाऱ्यांची गर्दी होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रथम कोणाला काहीच कळले नाही. जखमी झालेल्या फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार इतर नागरिकांना कळला. तत्पूर्वी संशयिताने तेथून पळ काढला. मारहाण प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री संशयिताविरोधात गुन्हा नोंद झाला. याबाबतचा तपास अंमलदार राजेंद्र सकपाळ करीत आहेत.