- सरदार चोगुले
कोल्हापूर - माणसाला कोठे, कधी, कसेही मरण आले तर अंत्यसंस्कार राहत्या गावातचं व्हावे.अशी इच्छा असते.असेच दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
उदाळवाडी (ता.पन्हाळा) येथील अभिनंदन संजय पाटील असे त्या युवकांचे नाव आहे. सर्वत्र मुसळधार पावसाने आणि महापूराच्या विळख्याने हाहाकार माजला असताना २२ तासाच्या संघर्षमय प्रवासानंतर त्याचा अंत्यविधी गावात करण्यात आला.
वाघवे मुळ गाव असणारा अभिनंदन पाटील आईच्या मृत्यूनंतर उदाळवाडी येथे मामाच्या गावी वास्तव्यास होता.तो खाजगी कंपनी काम करत होता.दोन महिन्यापूर्वी त्याला निमोनिया झाल्याने त्याला उपचरासाठी कोल्हापूर येथे सीपीआर दवाखान्यात ठेवले होते; परंतू आजार बळावल्यामुळे महिन्यापूर्वी त्याला मुंबई येथील जे.जे.इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याची बुधवारी सकाळी प्राणज्योत मावळली.
कोल्हापूरला पावसाने व महापुराच्या पाण्याने थैमान घातल्याने मृतदेह गावाकडे नेऊ नका अशा विनवण्या डाॅक्टर नातेवाईकांना करत होते; परंतु, मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडेच नेण्यावर नातेवाईक ठाम होते.
बुधवारी दुपारी अंधेरी येथील शिवसेनेच्या रूग्णवाहिकेने मृतदेह घेऊन कोल्हापूरकडे येत असताना अनेक संकटाना तोंड देत यावे लागले.
पुणेच्या दरम्यान रूग्णवाहिकेला सरकारी अधिकाऱ्ऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने तेथे वांदग निर्माण झाले. त्यानंतर दोन ठिकाणी पोलिसांनी पुराच्या पाण्यातून गाडी घालण्यास नकार दिला होता; पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनीही माणूसकी दाखवत मदत केली.सुरक्षेच्या दृष्टीने गाडी रस्त्यावरील पाण्यातून बाहेर पडल्यानंतर सायरन करण्याचा इशारा करण्याची ताकीद दिली होती.अशा अनेक संघर्षमय प्रवासातून अभिनंदन पाटीलवर गुरुवारी मध्यरात्री मामाच्या गावी अंत्यसंस्कर करण्यात आले.