राजाराम लोंढे -- कोल्हापूरएकेकाळी शिवाजी पेठेची अस्मिता व आर्थिक कणा असलेल्या बलभीम को-आॅप. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नंदकुमार तिवले, उत्तम कोराणे, विक्रम जरग यांच्यासह १७ माजी संचालक व दोन अधिकाऱ्यांवर ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. याबाबतच्या नोटिसा आज, शनिवारी लागू केल्या जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.बलभीम बँक ही शिवाजी पेठेसह कोल्हापूर शहराची अस्मिता होती; पण संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बँकेचे विलीनीकरण करण्याची वेळ आली. कर्जदारांना विनातारण कर्जवाटप, असुरक्षित कर्जाचे ग्रामीण भागात वाटप, व्यवसाय नसताना ग्रामीण भागात सुरू केलेल्या शाखा यामुळे बँक आतबट्ट्यात आली. बँकेच्या काही सभासदांनी संचालकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. चौकशीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होऊन संचालकांवर सुमारे अडीच ते पावणे तीन कोटींचा ठपका ठेवला होता. त्यानंतर संचालकांना म्हणणे सादर करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. विविध कलमांतर्गत चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संचालकांवर ‘कलम ८८’ नुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली.दरम्यान, संचालकांनी बँक विलीनीकरणाचे प्रयत्न सुरू केले. मुंबईच्या अपना सहकारी बँकेत २ जून २०११ ला अखेर बलभीम बँकेचे विलीनीकरण झाले. त्यानंतर ८८ च्या कारवाईची गती काहीसी कमी झाली पण मार्च २०१६ अखेर राज्यातील ‘कलम ८८’ नुसार चौकशी सुरू असलेल्या संस्थांवर कारवाई पूर्ण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिल्याने या कारवाईला गती मिळाली. त्यानुसार गेले दोन दिवस तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी ८८ नुसारची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन दिवस त्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला असून शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी कलम ८८ च्या नोटिसांवर स्वाक्षरी केली.
जरग, कोराणेंवर जबाबदारी निश्चित
By admin | Published: February 06, 2016 12:37 AM