कोल्हापूर : कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याच दिवशी कामाचा निपटारा करीत झिरो पेंडन्सीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना व इतर १००० प्रकरणे त्याच दिवशी निकाली काढली जातील. शासनमान्यतेनंतर त्याच दिवशी हातात वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.शिंदे हे सध्या कऱ्हाड कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. १ जूनपासून कोल्हापूर विभागाचा आरटीओ पदभार शिंदे यांच्याकडे आहे. कऱ्हाड कार्यालयात रोज १५० वाहन चालविण्याचे परवाने व इतर परिवहन कार्यालयांशी संबंधित कामे त्याच दिवशी पूर्ण करण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. हाच प्रयोग गेली काही दिवस कोल्हापुरात राबविण्यात येत आहे.
याविषयी माहिती देताना शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मुख्य कार्यालय व शिबिरे अशी मिळून रोज किमान ५०० वाहन चालविण्याची प्रकरणे असतात. यासह परवाना नूतनीकरण, नवीन गाड्यांच्या नोंदणीची सुमारे ५०० कामे अशी एकूण १००० प्रकरणे असतात.
या सर्व कामांसाठी शासनाने ८ ते ३० दिवसांचा कालावधी ठरवून दिला आहे. ही प्रकरणे सुमारे आठ ते दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातातून जातात. झिरो पेंडन्सीचा अर्थ एका टेबलावरून पुढील टेबलावर एका दिवसात काम जाणे असा घेतला जातो. त्याहीपुढे जाऊन कऱ्हाड मध्ये वाहन परवान्यासह कार्यालयातील त्या-त्या दिवशीची प्रकरणे त्याच वेळी पूर्ण करण्याचा प्रयोग गेली तीन महिने राबविला. हाच प्रयोग आता कोल्हापुरात राबविला जाणार आहे.
सद्य:स्थितीत त्याच दिवशी वाहन चालविण्याचा परवाना तयार होईल. यानंतर तो स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल. पोस्टामुळे थोडा विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनमान्यतेनंतर त्याच दिवशी थेट चालकाच्या हातात लायसेन्स देण्याची योजना आहे.
आॅनलाईन पेमेंटमुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून लायसेन्स टेस्ट ड्राईव्ह सुरू करता येईल. त्याचा फायदा विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना होईल. शुल्क भरणा व वेळ निश्चितीकरण, आदी कामेही आॅनलाईनमुळे पारदर्शी झाली आहेत. यासह परवाना नूतनीकरणही त्याच दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.