कोल्हापूर : खगोलशास्त्रात ज्या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असं म्हणतात, त्याची प्रचिती ६ मे २०२२ रोजी कोल्हापूरकरांना येणार आहे. या दिवशी ५० सेकंदांपर्यंत सावली कोल्हापूरकरांची साथ सोडणार आहेे. दिनांक ६ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत जवळ जवळ ५० सेकंदांपर्यंत हा शून्य सावलीचा खेळ रंगणार आहे.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्यांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो; मात्र जे लोक कर्क, मकर आणि विषुववृत्ताच्या ठिकाणी राहतात, त्यांना वर्षातून एकदाच हा शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या वरच्या भागात तसेच मकरवृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र शून्य सावली दिवस अनुभवता येणार नाही. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, त्याला २३.५ डिग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तांवरून बरोबर तीन महिन्याने वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो.
या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर पडतात, त्यामुळे विषुववृत्तावरती कुठंही उभारले तरी आपली सावली काही काळ नाहीशी होते. यानंतर बरोबर तीन महिन्यांनी मकर वृत्तावरती,नंतर तीन महिन्यांनी परत विषुववृत्तावरती आणि परत तीन महिन्यांनी कर्कवृत्तावरती आपणांस शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो; मात्र कर्कवृत्त आणि विषुववृत्त या दोन स्थानांमध्ये सूर्याची किरणे ज्यावेळी १६.७४ डिग्री नॉर्थ या रेखांवृत्तावरती पडतील, त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या जागांवरती काही सेकंदाकरिता आपली सावली काही ठराविक वेळी काही सेकंदाकरिता अदृश्य होते.
या काळात जर सावधान स्थितीत उभे राहून किंवा आपल्या जागेवर उडी मारून पाहिले तर आपली सावली आपणास दिसणार नाही.या काळात जर सावधान स्थितीत उभे राहून किंवा आपल्या जागेवर उडी मारून पाहिले तर आपली सावली आपणास दिसणार नाही.
बरोबर तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात ६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपासून ५० सेकंदांपर्यंत पुन्हा एकदा शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. पृथ्वी जसजशी फिरत जाईल तसतसे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शून्य सावलीचा आनंद घेता येईल. - प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर, भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागप्रमुख, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर.