कोल्हापूर : राज्य शासनाकडून विविध करांपोटी येणारे सुमारे दहा कोटी रुपये न मिळाल्याने गतवर्षीपेक्षा कमी निधीचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज मंगळवारी सादर करण्यात येणार आहे. बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेमध्ये अर्थ समिती सभापती प्रवीण यादव अर्थसंकल्प मांडतील.
गतवर्षी जिल्हा परिषदेचा ३९ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र त्यानंतर कोरोनाचा परिणाम जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नावर झाला आहे. अशातच विविध करांपोटी जिल्हा परिषदेला मिळावयाचे दहा कोटी रुपये अजूनही शासनाकडून मिळालेले नाहीत. याचा परिणाम म्हणजे किमात सहा ते सात कोटींनी अर्थसंकल्पाची रक्कम कमी येण्याची शक्यता आहे. तसेच गेल्यावर्षी प्रमाणेच पाच ते सहा लाख रुपये असा स्वनिधी राहण्याची शक्यता आहे.
नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही नावीन्यपूर्ण योजना सुचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्यासह चव्हाण यांनी सोमवारी अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, स्वाती सासने यांच्याशी चर्चा केली.
नियमित विषयांपेक्षा या सभेत ऐनवेळचेच विषय जादा असण्याची शक्यता आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी दिलेला निधी, दलित वस्तीचा ३६ कोटींचा निधी, थांबलेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी यातून मंजूर झालेली बहुतांशी कामे मंजुरीसाठी आजच्या या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहेत.
चौकट
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज सभागृहातील सदस्यांची बैठक व्यवस्था बदलण्या आली आहे. पाठीमागे असणाऱ्या खुर्च्या काढून टाकण्यात आल्या असून, त्या ठिकाणी बाक टाकण्यात आले आहेत. सभागृहात आता जाताना सॅनिटायझेशन करावे लागणार असून, सुरक्षित अंतरावर बसावे लागणार आहे.