समीर देशपांडे ।कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूरजिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या खेळामध्ये सत्तारूढ भाजपचेच मोहरे आघाडीवर असल्याने ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी पदाधिकाऱ्यांची अवस्था झालीआहे.
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तारूढांमध्ये किती समन्वय आहे, याचे प्रत्यंतर दिसून आले.मुळात जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेली मंडळी एकत्र आणली गेली. महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका अध्यक्ष होणार यासाठी पक्षभेद विसरून काहीजणांनी पाठिंबा दिला; तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘शब्द’ मानण्याचे अनेक फायदे असू शकतात, याचा विचार करूनही काहीजणांनी सहकार्याचा हात दिला.
भाजप मित्रपक्षांची सत्ता येऊन आता सव्वा वर्ष झाले आहे. स्वाभिमानी आणि प्रकाश आवाडे गट यांच्या अंतर्गत समझोत्यानुसार महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतिपद शुभांगी शिंदे यांच्याकडून वंदना मगदूम यांच्याकडे आले आहे. मात्र, उरलेला पदाधिकारी बदल थंडावला आहे; त्यामुळे स्वप्नभंग झालेले आक्रमक होत आहेत.
सुरुवातीपासून विरोधकांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने वठविण्याची सुरुवात केली. मात्र, विरोधकांच्या या नाट्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधाºयांनीच प्रमुख भूमिका वठवायला सुरुवात केली आहे. यामध्ये अरुण इंगवले आणि विजय भोजे हे तर नेहमी डॅशिंग भूमिकेतच असतात. भाजपचे गटनेते असलेल्या इंगवले यांनी मंगळवारच्या सभेत अधिकाºयांचा एकेरी विचारणा करत आणि ‘अहो, अंबरीश घाटगे, शिक्षण आणि अर्थ सभापती’ असा जावयांचा उल्लेख करत आपला इरादा स्पष्ट केला आहे; तर पक्षप्रतोद म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्या विजय भोजे यांनीच तडाखेबंद विरोधी बॅटिंग केली आहे. राहुल आवाडे आणि प्रसाद खोबरे यांचा वाद नळावरील भांडणासारखा होता.
अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काही निर्णायक क्षणी संबंधितांना सुनावण्याची आणि कामकाज पुढे नेण्याची भूमिका घेतली असली तर अंबरीश घाटगे हेच सभा हाताळत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील अधेमधे बोलण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर केवळ शांत राहून पाहणे पसंत करतात आणि समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे फारसे बोलून कुणाला अंगावर घेत नाहीत. यामध्ये अधिकाºयांची मात्र पुरती कोंडी होत असल्याचे दिसून आले. सीईओ अमन मित्तल नवीन आहेत. त्यांना भाषेची अडचण आहे. त्यामुळे ठाम भूमिका घेण्यासाठी अजून त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.
जे दोघे सत्तेत आहेत तेच आपल्या एकमेकांविरोधी मागण्यांसाठी खालून अधिकाºयांचा पंचनामा करत असल्याचे या सभेमध्ये दिसून आले आहे. ज्या पद्धतीने पारदर्शी कारभाराच्या खालून गप्पा मारल्या गेल्या, त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकरणामध्ये हस्तक्षेप न करता प्रत्येक विभागाचा लेखाजोखा काढायचा म्हटले तर सत्ताधारीसुद्धा काही प्रकरणांमध्ये अडचणीत येऊ शकतात. त्यामुळेच केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा कारभार कसा नीट चालेल, शासनाच्या नियमांच्या अधीन राहून होईल आणि यासाठी कारभारी मंडळींनी स्वत:चाच अवाजवी हस्तक्षेप टाळून कारभार सुधारण्यासाठी वेळ दिला तर ते निश्चितच जिल्हा परिषदेसाठी हिताचे ठरणार आहे. अन्यथा हे स्वकियांकडूनच होणारे वस्त्रहरण सत्ताधाºयांना पाहत बसावे लागणार आहे.पाठिंब्यासाठी विरोधकांच्या टाळ्याज्या पद्धतीने या सभेमध्ये सत्तारूढ गटातील कारभाºयांनी हल्लाबोल केला ते पाहता विरोधकांनी काहीही न करता केवळ टाळ्या वाजवून इंगवले, भोजे, खोबरे यांना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिकाही पुरेशी होती. एवढेच काम या सर्वांनी विरोधकांसाठी शिल्लक ठेवले होते.