लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय ही भावी नेतृत्व घडवणारी कार्यशाळाच आहे. या कार्यशाळेतील डझनभर इच्छुकांना आता ‘गोकुळ’ची हंडी खुणावू लागली आहे. यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील आजी-माजी पदाधिकारी, सदस्य अशा भूमिका निभावणाऱ्या डझनभर इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, विद्यमान उपाध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, ए. वाय. पाटील, बाबासाहेब देवकर, अभिजीत तायशेटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
ग्रामीण भागाशी संपर्क आणि स्थानिक राजकारणाशी जवळचा संबंध असल्याने जिल्हा परिषदेला जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व आहे. गोकुळ दूध संघाचे मतदार असलेल्या ठरावधारक संस्थादेखील जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यक्षेत्रातच येत असल्याने बेरजेच्या गणितात त्यांची बाजू उजवी ठरते. गोकुळ तर जिल्ह्याची सोन्याची हंडीच, त्याचा मोह सर्वांनाच होतो. त्याला जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्यही अपवाद नाहीत. आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनीच रिंगणात उड्या घेतल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यमान सदस्य व पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे.
माजी अध्यक्षा शौमिका महाडिक या जिल्हा परिषद सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. सत्ताधारी गटातून त्यांनी अर्ज भरला आहे. विद्यमान उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी विरोधी शाहू आघाडीकडून अर्ज भरला आहे. माजी शिक्षण सभापती व विद्यमान संचालक अंबरीश घाटगे यांनी सत्ताधारी गटाकडून अर्ज भरला आहे. विद्यमान सदस्य व विरोधी पक्षाचे गटनेते अरुण इंगवले, राष्ट्रवादीचे जीवन पाटील हे विद्यमान अर्ज भरलेल्यांच्या यादीत आहेत.
माजी पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व हिंदुराव चौगुले, माजी सदस्य बाबासाहेब देवकर व एस. आर. पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समितीचे सभापतीपद भूषविलेले विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, बाबा नांदेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत.
चौकट ०१
जिल्हा परिषदेतील पराभवानंतर थेट ‘गोकुळ’च्या रिंगणात
जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्यांदा लढवली, पण त्यात यश आले नाही, अशांनी आता गोकुळच्या रिंगणात उडी घेतली आहे. यात विरेंद्र मंडलिक, नविद मुश्रीफ, अजित नरके, प्रदीप पाटील-भुयेकर, रणजित पाटील या बड्या नेत्यांच्या वारसदारांचा समावेश आहे.
चौकट ०२
आतापर्यंत दोघांनाच यश
जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून कामाचा डंका वाजवल्यानंतर गोकुळमध्ये संचालकपद मिळवण्यात आतापर्यंत बाळासाहेब खाडे व अंबरीश घाटगे यांना यश आले आहे. खाडे हे जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर संचालक झाले तर अंबरीश घाटगे हे संचालक होऊन मग जिल्हा परिषदेत आले. हे दोघेही यावेळी सत्ताधारी गटाचे उमेदवार आहेत.