कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध पुरवठा होत नसल्याची तक्रार स्थायी समितीच्या सभेत बुधवारी करण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या वतीने मंजूर झालेल्या ३६ कोटी रुपयांच्या विकासकामांची प्रशासकीय मान्यता तातडीने द्यावी, असा आग्रहही यावेळी धरण्यात आला.
अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, राहुल आवाडे आणि कल्लाप्पा भोगण ऑनलाइन सहभागी झाले.
हाफकिनकडूनच औषधी घेण्याबाबत सूचना असल्यामुळे औषधी येण्यास विलंब होत आहे. मात्र, ५० लाख रुपयांची औषधी मागवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुशिक्षित बेरोजगारांना काम वाटप करण्याची बैठक तातडीने घेऊन कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. गेल्यावर्षीच्या निधीतील अनेक कामे अजून सुरू झालेली नाहीत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ती सुरू झाली नाही, असा आरोप यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केला.
समाजकल्याण विभागाकडून ३६ कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ग्रामपंचायतींकडून कामांचे अंदाजपत्रक घेऊन ही प्रक्रिया करण्यात येणार होती; परंतु सर्वांनीच या प्रक्रियेला आक्षेप घेतला. यावर यावेळी जोरदार चर्चा झाली. यानंतर मग नागरी आणि जनसुविधा योजनेतील कामांच्या प्रमाणेच याद्यांना मंजुरी देण्याचा निर्णय अखेरीस घेण्यात आला.
२५१५ मधील २०१८/१९ मधील ४५ टक्के निधी जिल्ह्यातील ९ तालुक्यांना आलेला नाही. हा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी यावेळी अरुण इंगवले यांनी केली. उधारी झाली तरी चालेल; परंतु औषधी आणा अशीही मागणी इंगवले यांनी केली. निधी नसल्यामुळे अडचणी असल्याचे तसेच गेल्यावेळच्या खरेदीबाबत तक्रार झाल्याचा मुद्दा पुढे आला. यावर राजवर्धन निंबाळकर यांनी गेल्यावेळीच जीएम पोर्टलवर खरेदी केली असती तर तक्रारी झाल्या नसत्या, असे सांगितले. कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आणखी एक डॉक्टर देण्याची मागणी यावेळी भोगण यांनी केली.
इतर रुग्णांकडे दुर्लक्ष
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी इतर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष नको, अशी भावना पदाधिकारी आणि सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कोरोनाचा ताण असल्यामुळे अन्य आजार असणाऱ्या आणि नियमित तपासणी आवश्यक असणाऱ्यांकडेही आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.