लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गोकूळच्या दूद उत्पादकांना दरवाढ देण्याबाबत आपण कटिबद्ध असून सध्या काटकसरीसह कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षपद आघाडीमध्ये नेमके कोणाला, याविषयी उत्सुकता होती. कॉंग्रेससह राष्ट्रवादीने दावा सांगितल्याने इच्छुकांची घालमेल सुरू हाेती. याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळीच अध्यक्षपदाचा फार्मुला ठरला होता. त्यानुसारच या निवडी होतील. अध्यक्षपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे राहील.
‘गोकूळ’मध्ये सत्ता येऊन दीड-दोन महिने झाले आहे. या कालावधीत बचतीचे अनेक कार्यक्रम हाती घेतले, त्यातून कोट्यावधी रुपयांची बचतही केली आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या कराराची मुदत संपण्यास सहा महिने कालावधी असल्याने ते रद्द करता येत नाही. मुदत संपल्यानंतर नवीन टेंडर काढून ठेके द्यावे लागतील. मुंबई, पुणे दूध वाहतूक टँकरचे १७ पैसे प्रतिलिटर भाडे कमी केले. खासगी पॅकिंग व्हायचे ते रद्द करून महानंदकडे दिले. सध्या बचतीचे धोरण आहे, हे पैसे वाचून तिजोरीत आल्यानंतर तुम्हाला बदल दिसेल.