कोल्हापूर : कोरोनामुळे शाळा आणि शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असला तरी प्राथमिक शिक्षकांवर मात्र जिल्हा परिषदेची चांगलीच कृपादृष्टी झाली आहे. तब्बल ३१ जणांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करून ऐन पावसाळ्यात पुरस्कारांचीही बरसात करीत सर्वांनाच खुश केले आहे. या खुश करण्याच्या नादात २० आदर्श शिक्षक पुरस्कार विभागून देण्यात आले आहेत. यावर गुणसंख्या समान असल्याचे शिक्षण सभापतींचे म्हणणे आहे.अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, पक्षप्रतोद उमेश आपटे, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण सभापती प्रवीण यादव व शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी गुरुवारी पुरस्कारांची घोषणा केली. तत्पूर्वी सकाळी ११ ते दुपारी चारपर्यंत जिल्हा परिषदेत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवलेल्या ४२ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील ३१ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यात २० पुरस्कार हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने, नऊ पुरस्कार जे. पी. नाईक यांच्या नावाने तर दोघांना विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. हे पुरस्कार गुणानुक्रमे व रीतसर प्रस्तावांची छाननी करूनच घेतले आहेत, असे शिक्षण सभापती यादव यांनी स्पष्ट केले.आदर्श शिक्षक पुरस्कार निवड ही दरवर्षी वशिलेबाजीमुळे गाजते. यावर्षी कोरोनामुळे यात फरक पडेल असे वाटत होते; पण इच्छुकांची वाढलेली संख्या आणि महाविकास आघाडीतील सर्वच कारभाऱ्यांना खुश करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारांची खांडोळीच केली आहे. दरवर्षी प्रत्येक तालुक्यात एक असे १२ आणि विशेष पुरस्कार दोन असे एकूण १४ जणांना हे मानाचे पुरस्कार दिले जातात; पण गेल्या वर्षीपेक्षा विभागून देण्याचा पायंडा पाडला गेला. या वर्षीच्या पदाधिकारी, कारभाऱ्यांनीही हा पायंडा पुढे चालवत पुरस्कारार्थ्यांची यादी लांबलचक करून ठेवली आहे.
विशेष पुरस्कार
- मीना खाडे, बोलकेवाडी, आजरा
- सदाशिव चौगुले, कोतोली, पन्हाळा
जे. पी. नाईक पुरस्कार
- विकास पाटील, हिडदुगी, गडहिंग्लज
- बाळासो कोठावळे, कोडोली, हातकणंगले
- शशिकांत पाटील, कोरोची, हातकणंगले
- केशव कांबळे, बेलवळे, कागल
- जयवंत पाटील, बाचणी, कागल
- रघुनाथ पुरीगोसावी, खुपिरे, करवीर
- पांडूरंग येरुडकर, कुडुत्री, राधानगरी
- जयश्री मगदूम, साळशी, शाहूवाडी
- सुभाष पडोळकर, दानोळी, शिरोळसर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार
- आजरा: उत्तम पोवार, धामणे
- भुदरगड : अशोक कौलवकर, दारवाड, छाया देसाई, अनफ खुर्द
- चंदगड : शामराव पाटील, कलिवडे, अनंत धोत्रे, गुडेवाडी
- गडहिंग्लज : शरद देसाई - लिंगनूर, विलास माळी - वडरगे
- गगनबावडा : जयसिंग पडवळ, खोपडेवाडी
- हातकणंगले : राजेशकुमार जाधव, शिरोली, उदय मोहिते, घुणकी
- कागल : बाबूराव चव्हाण, पिराचीवाडी, दादासो कुंभार, खडकेवाडा
- करवीर : मारुती ननवरे, कोगील खुर्द, सुकुमार मानकर, कुरुकली
- पन्हाळा : नितीन मानकर, आसुर्ले
- राधानगरी : दिगंबर टिपुगडे, मोहडेचाफोडी, सारिका हावळ, आणाजे
- शाहूवाडी : विक्रम पोतदार, कोतोली वारणा, भगवान पाटील, परखंदळे
- शिरोळ : अनिल खिलारे, चिपरी