कोल्हापूर : जिल्हा परिषदेेच्या सभापती निवासस्थानांच्या परिसरात उभारण्यात आलेले चंदगड भवन पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, फर्निचर आणि अन्य अनुषंगिक कामांसाठी दहा लाख रुपयांची गरज असून, आता हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या तालुक्यातील सदस्यांकडून केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण आणि विद्या विलास पाटील यांनी या तालुक्यातील सदस्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून चंदगड भवन बांधण्याची मागणी केली होती. केवळ मागणी न करता त्यांनी आपल्या दोन वर्षांचा २४ लाख रुपयांचा स्वनिधीही या कामासाठी दिला. १७७५ चौरस फुटांच्या इमारतीचे हे काम झाले असून, निधी कमी पडल्याने परत देण्याच्या बोलीवर अन्य सदस्यांचा निधीही या भवनसाठी वापरण्यात आला आहे.
या इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी झाले आहे. मात्र, फर्निचरसाठी आणि अन्य अनुषंगिक कामांसाठी दहा लाख रुपयांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून याची तरतूद व्हावी अशी मागणी सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. आता याबाबत काय निर्णय घेतला जातो त्यावर हे काम कधी पूर्ण होणार याचा निर्णय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अन्य सदस्यांनीही उर्वरित दहा लाखांचा निधी द्यावा या चंदगडच्या सदस्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
कोट
आम्ही आमच्या स्वनिधीच्या माध्यमातून चंदगड भवन उभारण्यास सुरुवात केली. आता इमारत पूर्ण झाली आहे. फर्निचरसाठी आता दहा लाख रुपयांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या अन्य सदस्यांनाही या इमारतीचा उपयोग होणार असल्याने या निधीची तरतूद व्हावी अशी आमची मागणी आहे.
कल्लाप्पाण्णा भाेगण
जिल्हा परिषद सदस्य
२४०३२०२१ कोल चंदगड भवन
कोल्हापुरात जिल्हा परिषद सभापती निवासस्थान परिसरात चंदगड भवन उभारण्यात आले आहे.