कुरुंदवाड : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याविना रुग्णालयच रुग्णावस्थेत असून, रिक्त पदाच्या भरतीकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, या आरोग्य केंद्रात त्वरित वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी होत आहे.सुमारे २५ हजार लोकवस्ती असलेल्या या शहराच्या मध्यभागी जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. सर्व सोयीनीयुक्त असलेली व सेवा चांगली मिळत असल्याने दररोज शंभरहून अधिक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. त्यामुळे नेहमी आरोग्य केंद्र रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी गजबजलेले असते. येथील वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांची आॅगस्टमध्ये बदली झाली आहे. मात्र, बदली करताना या रीक्त जागेवर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची गरज असते. मात्र, महिना झाला तरी या रिक्त पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याविना आरोग्य केंद्र निर्मनुष्य बनले आहे.या आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन औषध निर्माता, आरोग्यसेवक, परिचारक असा सात कर्मचाऱ्यांचा स्टाप आहे. मात्र, अधिकारीच नसल्याने ओपीडी बंद आहे. परिणामी, सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तर या आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांना कामाविना दिवस काढावे लागत आहेत. शहरामध्ये पोलीस ठाणे व न्यायालय असल्याने एखाद्या गुन्ह्यातील जखमींना औषधोपचारासाठी या रुग्णालयात आणले जाते. शिवाय मृत झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जाते. मात्र, वैद्यकीय अधिकारीच नसल्याने सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. शिवाय गुन्ह्यातील जखमींना उपचारासाठी, तसेच मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी शिरोळ, दत्तवाड येथील रुग्णालयांत जावे लागत आहे.सुसज्ज व सोयीनियुक्त आरोग्य केंद्रच आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील डॉक्टराविना आजारी पडले आहे. त्यामुळे शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, या रुग्णालयात त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून रुग्णसेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) येथील वैद्यकीय अधिकारी पदाबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. जिल्हा परिषदेकडून नवीन भरती झाल्यानंतर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळेल. महिनाअखेरपर्यंत पद भरण्यात येईल, तोपर्यंत तालुक्यातील इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना रोटेशन पद्धतीने सेवा देण्याचे आदेश दिले आहेत.- डॉ. पी. एस. दातार,तालुका वैद्यकीय अधिकारी, जयसिंगपूर
कुरुंदवाडमधील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रच सलाईनवर
By admin | Published: September 11, 2015 9:46 PM