अनिल पाटील - मुरगूड --निढोरी (ता. कागल) येथे निपाणी-राधानगरी या मुख्य रस्त्यालगतच असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्टोअररूमकडे दुर्लक्ष झाल्याने टुमदार इमारत काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे. गेले अनेक महिने येथे वॉचमन नसल्याने हा परिसर म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ असा झाला असून, इमारतीचे वीज बिलच न भरल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याने येथे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.कागल, राधानगरी, भुदरगड, आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतीला पूरक साहित्य देण्यासाठी संस्थान काळापासून मुरगूड शहरापासून २ कि.मी. अंतरावर निढोरी या गावामध्ये स्टोअररूमची टुमदार इमारत बांधलेली आहे. या इमारतीमध्ये अनेक वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरत होती; पण जवळच राज्य महामार्ग असल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या वरील बाजूस शाळेसाठी नवीन इमारत बांधल्यानंतर या इमारतीचा स्टोअररूम म्हणून उपयोग सुरू झाला. शेतीला उपयुक्त औजारे त्यामध्ये टिकाव, फावडे, कुदळ, नांगरीचे फाळ, पाट्या यांसह औषध फवारणीचे पंप, आदी साहित्य ठेवण्यासाठी याचा उपयोग जि. प.ने सुरू केला. निढोरी गावच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी ही वास्तू तब्बल पाच गुंठे क्षेत्रात पसरलेली आहे. एक मोठा हॉल, चार स्वतंत्र शयनकक्ष, दोन भांडारगृहे, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह अशा पद्धतीने इमारतीची रचना असून, इमारतीच्या चारही बाजंूनी दोन गुंठ्यांहून अधिक मोकळी जागा असल्याने ही इमारत प्रशस्त वाटते. तथापि, सौंदर्यपूर्ण अशा या इमारतीकडे खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, ‘करंट रिपेअरी’च्या नावाखाली अनेकदा पैसे खर्च करूनही या इमारतीमध्ये आवश्यक सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. स्टोअररूममध्ये असणाऱ्या अनेक डेड स्टॉकवरील वस्तू नामशेष होत चालल्या आहेत. किमती वस्तू असूनही दुर्लक्षामुळे त्या नष्ट होत चालल्या आहेत. शिवाय गेल्या कित्येक महिन्यांपासून पहारेकरीच नसल्याने ही इमारत म्हणजे सार्वजनिक ठिकाणच झाले आहे. रिकाम्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांचा खेळ सुरू असतो. या ठिकाणी कोणी हटकणारे नसल्याने लोकांचा वावर वाढला असून, या इमारतीला धोकाही वाढला आहे. या इमारतीमधील दुरुस्त्या वेळेत केल्या आणि कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या पहारेकऱ्याची नेमणूक केली, तर ही संस्थानकाळातील इमारत सुरक्षित राहील.
निढोरीतील जि. प.च्या स्टोअररूमला वाली कोण?
By admin | Published: June 05, 2015 11:53 PM