परळी : पावसाळा सुरू झाला की ठोसेघरचा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांना जणू मोहिनी घालतो. म्हणूनच यंदा ठोसेघर ग्रामपंचातीने पर्यटकांच्या स्वागतासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. धबधब्याचा जलप्रपात पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन झुणका-भाकरची मऱ्हाटमोळी झणझणीत मेजवानी दिली जाणार आहे. पाऊस लांबल्यामुळे यंदा ठोसेघरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या घटते की काय, अशी भीती येथील व्यावसायिकांना वाटत होती. मात्र, मान्सून दाखल झाल्यामुळे पर्यटकांच्या स्वागतासाठी ग्रामपंचातही सज्ज झाली आहे. पावसाळी हंगामाच्या पहिल्या दिवशी ठोसेघर धबधब्यास भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे मऱ्हाटमोळे स्वागत करण्यात येणार आहे. इतर दिवशीही गरमागरम झुणका-भाकर खाण्यास मिळणार आहे. ठोसेघर येथे धबधबा पाहण्यासाठी लहान मुले, वृद्ध, महिला येत असतात. पावसापासून बचाव होण्यासाठी त्यांच्यासाठी छत्री, रेनकोटही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (वार्ताहर) रुग्णवाहिकाही राहणार तैनात धबधबा परिसरात आतापर्यंत बारा दुर्घटना घडल्या आहेत. छोट्या धबधब्यात अतिउत्साही पर्यटक उतरतात. अशावेळी दुर्घटना घडते. तसेच आजारी पडल्यास त्यांना प्रथमोपचार मिळावेत, यासाठी याठिकाणी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा धबधबा कोसळण्याची सध्या ठोसेघर धबधबा कमी प्रमाणात वाहत आहे. पावसाचे आगमन झाल्यानंतर कोसळणारा धबधबा पाहण्याची मजा काही औरच असते. त्यातच ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने आगळावेगळा उपक्रम हाती घेतल्यामुळे पर्यटकांना वेध लागले आहेत ते धबधबा कोसळ्याचे. ठोसेघर धबधब्यास अधिकाधिक पर्यटकांनी भेट द्यावी, येथील निसर्गसौंदर्याची नजाकत सर्वांनी अनुभवावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा आदर राखला जातोच; शिवाय यंदा त्यांचे यथोचित स्वागतही केले जाणार आहे. - जयराम चव्हाण, सरपंच, ठोसेघर
पर्यटकांना झुणका-भाकरची मेजवानी
By admin | Published: June 09, 2015 10:29 PM