समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाचा ८० टक्के निधी ग्रामपंचायतीला आणि प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्याचा निर्णय मी ग्रामविकास मंत्री असताना घेतला होता. परंतू लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटीत हा २० टक्के निधी रोखण्यात आला आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा करून हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्हा परिषदेेच्या चौथ्या मजल्याच्या उद्घघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, माजी अध्यक्ष बजरंग पाटील, डी. सी. पाटील, राहूल पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना या चौथ्या मजल्यासाठी निधी मंजूर केला आहे आणि त्यांच्याच हस्ते उद्घघाटन हाेत आहे हा चांगला योग आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सांगावकर यांनी आभार मानले.