विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांना २ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही वर्षे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाल्याचे छातीठोकपणे काही सदस्य सांगत आहेत.
तर दुसरीकडे मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असताना आपल्या कार्यकर्त्याला या पदावर बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नेत्यांनी स्पष्ट केल्याशिवाय नेमके काय ठरले होते हे कळणे अशक्य आहे.
जर खरोखरच हे पद कॉंग्रेसकडे राहणार असेल तर सतेज पाटील आपल्या गटाकडेच हे पद ठेवणार हे उघड सत्य आहे. त्यामुळे सरिता खोत, अरुण सुतार, भगवान पाटील यांची नावेे चर्चेत आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि पी. एन. पाटील गटाला संधी देण्याचे ठरले, तर पांडुरंग भांदिगरे यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र, जर अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला तर साहजिकच युवराज पाटील यांचे नाव अग्रभागी असेल, परंतु त्याच पदावर जयवंतराव शिंपी यांचाही दावा असेल. कॉंग्रेसकडे अध्यक्ष पद गेल्यास शाहूवाडी तालुक्यातील सदस्य विजय बोरगे यांनी उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. या दोन्ही पदांचा काय निर्णय होताे त्यावर उर्वरित सभापतींच्या राजीनाम्याचा निर्णय अपेक्षित आहे.
सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्याने नेते आणि पदाधिकारीही त्यामध्ये गुंतले आहेत. मुदत संपण्यादिवशीच या दोघांचे राजीनामे घेतले जाणार की ग्रामपंचायत मतमोजणीनंतर ही प्रक्रिया सुरू होणार हेदेखील अजून निश्चित झालेले नाही.
चौकट
भगवान पाटील यांचा दाखला तयार
अध्यक्षपद हे इतर मागाससाठी आरक्षित असल्यामुळे गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी आपला दाखला तयार ठेवला आहे. इतर इच्छुकांना ‘गोकुळ’मध्ये संधी दिली जाणार असेल तर ऐनवेळी पाटील यांनी आपले नाव पुढे आल्यास अडचण नको म्हणून हा दाखला तयार ठेवला आहे. पुन्हा गगनबावडा तालुक्याला संधी दिली जाईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
चौकट
राजाराम कारखाना, ‘गोकुळ’चे संदर्भ
पालकमंत्री सतेज पाटील यांना राजाराम साखर कारखाना आणि ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत ठेवण्यासाठी हे पद राष्ट्रवादीलाही दिले जाऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे. कसबा सांगाव येथील युवराज पाटील यांचा राजाराम साखर कारखाना कार्यक्षेत्रात चांगला संपर्क असल्याने मग त्यांना संधी दिली जाऊ शकेल.