हुपरी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ६७ जागांपैकी किमान ४० जागा निश्चितपणे मिळतील. उर्वरित जागांपैकी आघाडीच्या जागा निवडण्यासाठी भाजप, मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुढील दहा दिवस रात्रीचा दिवस करून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुपरी व रेंदाळ मतदारसंघात शनिवारी सकाळपासून चंद्रकांतदादा पाटील यांची संपर्क यात्रा आयोजित केली होती. यावेळी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने आतापर्यंत अनेक वर्षे सत्ता भोगली मात्र ग्रामीण भागाचा विकास त्यांच्याकडून होऊ शकला नाही. भ्रमनिरास झालेल्या जनतेने देशाची व राज्याची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सोपविली आहे. त्यांनी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी जनतेने आता जिल्हा परिषदेची सत्ता भाजप व मित्र पक्षांच्या हातात देण्याची गरज आहे.पंतप्रधान मोदी यांनी सत्ता सूत्रे हातात आल्यानंतर शेतकरी, उद्योजक, नोकरदार, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी विविध प्रकारच्या विकासाच्या योजना अंमलात आणल्या आहेत. अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून सुमारे ५० कोटी जनतेचा विमा उतरला जाणार असून, या योजनेतून तीन पिढ्यांचे कल्याण करण्याची सोय करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक स्मारके उभारून त्यांचा विचार, आचार व वसा भावी पिढीपुढे मांडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यावेळी आण्णासाहेब शेंडुरे, उमेदवार स्मिता वीरकुमार शेंडुरे, जयकुमार माळगे, टी. एम. नाईक, विलास रानडे, मंगलराव माळगे, सुदर्शन खाडे, सयाजीराव पाटील, उदय शास्त्री, नेताजी निकम, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)हुपरी येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजयी खूण दाखवीत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी उमेदवार जयकुमार माळगे, टी. एम. नाईक, आण्णासाहेब शेंडुरे, सयाजीराव पाटील, आदी उपस्थित होते.
जि.प.च्या ४० जागा जिंकणारच
By admin | Published: February 12, 2017 12:37 AM