तालुक्यातील ६१ गावांच्या ग्रामपंचायतींसाठी एकूण १ हजार ५२३ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. दरम्यान, शुक्रवारी १४ जणांनी माघार घेतली होती. त्यामुळे १ हजार ५०९ उमेदवार रिंगणात राहिले होते. सोमवारी ३१८ जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १ हजार १९१ उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.
यापूर्वीच तालुक्यातील रुद्रवाडी, टाकळी, धडकनाळ व जकनाळ अशा चार ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या, तर शेवटच्या दिवशी डांगेवाडी, क्षेत्रफळ या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत, तसेच १८ गावांतील २८ सदस्य बिनविरोध निघाले आहेत. तालुक्यातील आडोळवाडी, इस्लामपूर, रुद्रवाडी व कुमदाळ हेर येथून एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांनी दिली.