जळकोट तालुक्यात सतत पाऊस होत आहे. शनिवारी पहाटे ४ ते सकाळी ६ वाजण्याच्या कालावधीत पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तलाव तुडुंब भरले आहेत. तसेच नदी-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे कोळनूर ते माळहिप्परगा मार्गावरील पूल वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसह प्रवाशांची अडचण झाली होती. जवळपास १० तासांपेक्षा अधिक वेळ हा रस्ता पाण्यामुळे बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना ये-जा करता आली नाही.
दरम्यान, सोनवळा येथील दोन तरुण या पुलावरून माळहिप्परगा गावाकडे जात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून जात असल्याचे पाहून बालाजी केंद्रे यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या दोघांना वाचविले. तसेच नदीनजीकचा जंगमवाडी तलाव भरला आहे. आणखीन पाऊस झाल्यास तो फुटून शेती पिकांचे नुकसान होईल, अशी भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे.
मुसळधार पावसामुळे रावणकोळा, माळहिप्परगा, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद, देगलूर, आदी गावांना जाणारे रस्ते बंद झाले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पाणी कमी होण्याची प्रतीक्षा लागली होती.