बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) - देश स्वतंत्र झाल्यानंतरही हैद्राबाद, कर्नाटक, मराठवाडा हा भाग स्वतंत्र झाला नव्हता. तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिल्ट्री कारवाई करुन हा भाग स्वतंत्र केला. तत्पूर्वी गोरटा गावात अडीच फुटांचा झेंडा फडकाविल्याने निजामाने १०३ लोकांची कत्लेआम केली होती. त्यामुळे आज येथे १०३ फुटांचा तिरंगा ध्वज फडविण्यात येत असून त्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोरटा (जि. बीदर) येथे रविवारी केले. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसने निजामाच्या गुलामीची निशानी टिकविली. मात्र, भाजपाने ती मोडित काढून या भागाचे नामकरण केले अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील गाेरटा (ता. बसवकल्याण) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अनावरण व हुतात्मा स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत होते. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण, तेलंगणातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजयकुमार, आमदार शरणू सलगर, माजी आ. मारुतीराव मु़ळे, महाराष्ट्र भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर आदी उपस्थित हाेते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, निजामासाेबतच्या लढाईत बसवकल्याण तालुक्यातील गाेरटा येथील १०० पेक्षा जास्त नागरिक शहीद झाले. त्याची आठवण म्हणून येथे शहीद स्मारक आहे. स्मारकाचा विस्तार व सुशोभिकरण पुढील वर्षापर्यंत ५० कोटी खर्चून करण्यात येईल. काँग्रेसने निजामाचा इतिहास पुढे नेण्याचे काम केले. आम्ही ते पुसत या हैद्राबाद, कर्नाटक भागाचे नामकरण करुन कल्याण कर्नाटक केले. काँग्रेस व जनता दल ह्या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. एकाच चक्कीचा आटा आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कर्नाटकच्या विकासासाठी भाजपाला बहुमताने विजयी करा, असे आवाहनही केले.
काँग्रेसने राममंदिरचा मुद्दा प्रलंबित ठेवला होता. तो न्यायालयाने निकाली काढला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तेथील ३७० कलम भाजपाने रद्द करुन शांतता निर्माण केली. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, निजामकाळात गोरटा गावातील नागरिकांनी वंदे मातरम् हे नाटक ठेवले हाेते. ते सादर करु नये, म्हणून निजामाने आदेश काढला हाेता. या आदेशाला न जुमानता येथील ग्रामस्थांनी नाटकाचे सादरीकरण केले. चिडलेल्या निजामाने जालियनवाला बाग हत्याकांडसारखी येथे नागरिकांची हत्या केली. यात १०३ हुतात्मा झाले. त्या़ंची आठवण म्हणून येथे हुतात्मा स्मारक बनविले आहे, असेही त्यांनी सांगितले.