- राजकुमार जाेंधळे लातूर : काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील हासाेरीसह परिसरातील नऊ गावांमध्ये भूगर्भातून आवाज येत हाेते. दरम्यान, या भागात दाेन आठवड्यांत भूकंपाचे तीन साैम्य धक्के झाले आहेत. एकंदर गेल्या २९ वर्षांत लातूर, नांदेड, हिंगाेली जिल्ह्यात एकूण १०५ भूकंपाचे धक्के बसल्याची नाेंद आहे.
दि. ३० सप्टेंबर १९९३च्या भूकंपानंतर मराठवाड्यासह देशाला भूकंपाने झालेला विध्वंस पहायला मिळाला. २९ वर्षे उलटले तरी सप्टेंबर महिना उजाडला की कटू आठवणी समाेर येतात. त्यातच यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील तीन साैम्य धक्क्यांनी भूकंपाची पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन करीत संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. शिवाय, धाेकादायक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आत्पकालीन परिस्थितीत मुलांना, वृद्ध व्यक्तींना तसेच पशुधनांना कसे सुरक्षितस्थळी हलवायचे याचे नियाेजन केले आहे. १९९३च्या माेठ्या भूकंपानंतरच्या २९ वर्षांचा आढावा घेतला असता, सर्वाधिक धक्के हे २००७ मध्ये बसले असून, त्याची संख्या १७ आहे.
१९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के...३० सप्टेंबर १९९३ ते २३ सप्टेंबर २०२२ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४५ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारी परिसराला ११ धक्के जाणवले. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात किल्लारी, लाेहारा, उमरगा परिसरात सर्वाधिक धक्के बसले. दि. १३ सप्टेंबर २०१८ राेजी ३.९ रिश्टर स्केलचा धक्का, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.१ आणि २.७ रिश्टर स्केलचे दाेन धक्के बसले, तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैम्य धक्क्यांची नाेंद आहे.
लातूर-उस्मानाबादला सर्वाधिक धक्के...३० सप्टेंबर १९९३ ते २०२२ या काळात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ५३ भूकंपाचे धक्के बसल्याची नाेंद आहे. यामध्ये १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के २०१० आणि २०११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते २०२२ या काळात २१ धक्क्यांची नाेंद असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी म्हणाले.