लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेला शुक्रवारी सुरुवात झाली. पहिलाच मराठीचा पेपर कॉपीमुक्त वातावरणात जिल्ह्यातील १५३ केंद्रावर पार पडला. दरम्यान, ३९ हजारांवर विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले असून, विविध केंद्रावर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवित स्वागत करण्यात आले.
दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. बोर्डाच्या वतीने १५३ केंद्रांचे नियोजन करण्यात आले. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी विविध केंद्रांना भेटी देत तपासणी केली. लातूर तालुक्यातील बोरी येथील केंद्रावर एक कॉपीकेस सापडली. त्या व्यतिरिक्त सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा झाली.
शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर झाला. लातूर विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने २२ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच २९ भरारी पथके नियुक्त होती. लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी विविध केंद्रांना भेटी देत तपासणी केली. यंदा विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला. लातूर तालुक्यात ५१ केंद्रांवर १४,०६५, औसा १३ केंद्रांवर ३,१०४, निलंगा १६ केंद्रांवर ४,००१, शिरूर अनंतपाळ ४ केंद्रांवर ८४३, देवणी ६ केंद्रांवर १,२९३, उदगीर २५ केंद्रांवर ६,०६९, जळकोट ४ केंद्रांवर १,००२, अहमदपूर १९ केंद्रांवर ४,६४४ आणि रेणापूर तालुक्यातील ६ केंद्रांवर १ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.