अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सराफा लाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील जवळपास अकरा दुकानांना आग लागल्याची घटना रविवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडली. यात व्यापाऱ्यांचे जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सराफा लाईन रस्त्यावर असलेल्या पत्र्यांच्या दुकानास रविवार पहाटे अचानकपणे आग लागली. या आगीत अकरा दुकाने भस्मसात झाली. यात स्वीट मार्ट, किराणा, दातांचा दवाखाना, प्लास्टिक पाईप, सौंदर्य प्रसाधने अशा दुकानांचा समावेश आहे. धुराचे लोट पाहून रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास ही माहिती दिली. त्यावरुन अग्निशमन दलाचे कर्मचारी कैलास सोनकांबळे, प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड, अजित लाळे हे घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान, उदगीर, चाकूर, लोहा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन तास अथक प्रयत्न करावे लागले.
ही आग आटोक्यात आणताना कैलास सोनकांबळे व राहुल गायकवाड यांचे हात भाजले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. घटनास्थळास पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.