उस्तुरी : परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र, निलंगा तालुक्यातील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. निलंगा तालुक्यात परतीचा अतिपाऊस झाला. खरीप पिकांसह काही भागात जमिनीचेही नुकसान झाले. तालुक्यातील तांबाळा येथील १ हजार २६० शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आशा शासनाच्या मदतीकडे लागल्या. तेव्हा राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. तांबाळा येथील १ हजार २६० पैकी केवळ १ हजार १५० शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले आहे. अद्यापही येथील ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असून सातत्याने तलाठी सज्जाकडे चकरा मारत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, येथील तलाठी विश्वनाथ तोंगरीकर म्हणाले, तांबाळा येथे एकूण १ हजार २६० शेतकरी आहेत. त्यापैकी १ हजार १५० शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. ११० शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
कागदपत्रांची पूर्तता करावी...
येथील मंडळ अधिकारी ओ. बी. शेळके म्हणाले, काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित आहेत. सदरील शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे.