उदगीर : तालुक्यातील गुरदाळ येथील तेरा आरोपींनी राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषातून गावातील एकाच्या डोक्यात काठीने हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी उदगीरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुन्ह्यातील मयत एकास वगळून उर्वरित १२ आरोपींना सश्रम जन्मठेप प्रत्येकी १० हजारांचा दंड शुक्रवारी सायंकाळी सुनावला आहे.
तालुक्यातील गुरदाळ येथील दिगंबर यशवंतराव पाटील (५८) हे २३ मे २००३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरी जेवण करीत होते. तेव्हा तेरा जणांनी संगनमत करून घरात घुसून राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषापोटी दिगंबर पाटील यांच्या डोक्यात काठीने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच खून केला. तसेच घरातील इतरांना व नातेवाइकांनाही जबर जखमी केले.
याप्रकरणी मयताचा मुलगा बस्वराज पाटील यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. कदम यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला.
सहायक सरकारी वकील ॲड. गौसपाशा सय्यद यांनी युक्तिवाद सादर केल्यानंतर न्यायाधीश आर. एम. कदम यांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्ह्यातील आरोपी शिवराज हणमंतराव पाटील, दिलीप शिवराज पाटील, रामराव भगवंतराव उजळंबे, शंकर विठ्ठलराव पाटील, माधव राजेंद्र शिंदे, संजय शिवराज पाटील, राजेंद्र बाजीराव शिंदे, विनायक हणमंतराव पाटील, रतिकांत विनायक पाटील, मारोती दौलतराव बिरादार, विजयकुमार शिवराज पाटील, विठ्ठल माधवराव पाटील (सर्व रा. गुरदाळ) या १२ आरोपींना कलम ३०२ भादंविप्रमाणे सश्रम जन्मठेप शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास आणखीन एक वर्ष कारावास सुनावला आहे. या प्रकरणातील आरोपी राजकुमार शिवराज पाटील हा मयत झाला आहे.
या प्रकरणात सहायक सरकारी वकील ॲड. गौसपाशा सय्यद यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. शिवकुमार गिरवलकर, ॲड. एस. आय. बिराजदार, ॲड. बालाजी शिंदे, ॲड. प्रभूदास सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोहेकॉ. अक्रम शमशोद्दीन शेख यांनी सहकार्य केले.