तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. तसेच कोविड रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून आरोग्य सेवा दिली जात आहे. गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जळकोटातील गंभीर रुग्णांना उदगीर अथवा लातूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे. परंतु, तिथेही ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना नांदेड, हैदराबाद, सोलापूरला घेऊन जावे लागत आहे.
जळकोटात किमान दोन व्हेंटिलेटर, २५ ऑक्सिजनयुक्त खाटा, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन दिल्यास तालुक्यातील रुग्णांची सोय होणार आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. दरम्यान, जळकोटातील नवीन कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त २५ खाटा, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना सूचना केल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
होम आयसोलेशनमध्ये २४३...
रविवारी नवीन ४५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण १ हजार ४६० जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १ हजार २२९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उपचारादरम्यान २६ जण दगावले आहेत. सध्या ३०५ ॲक्टिव्ह रुग्ण असून, २४३ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अतिगंभीर ३५ जणांना रेफर करण्यात आले आहे. २२ जण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
सध्या जळकोटात ४०, कुणकी २३, गुत्ती १०, घोणसी १९, जगळपूर १४, चेरा २३, सिंदगी ६, लाळी १६, धामणगाव १० असे रुग्ण असून, हॉटस्पॉट असलेल्या पाच गावांतील रुग्ण संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली.