राजकुमार जाेंधळे, लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १२५ माॅडीफाय सायलेन्सर्स हॉर्नचा लातूर पाेलिसांकडून राेलरखाली चुराडा करण्यात आला आहे. याबाबत वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई, खटला दाखल केला आहे. गत सहा महिन्यांतील ही दुसरी माेठी कारवाई आहे.
लातुरात मॉडीफाय सायलेन्सर, हॉर्न लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीचालकांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समाेर आले. शहरातील रुग्णालय, शाळा-महाविद्यालय तसेच शांत व सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश हॉर्न, मॉडीफाय सायलेन्सरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण करताना आढळून आले आहे. परिणामी, माॅडीफाय सायलेन्सर्स, कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दुचाकीवरून आवाज करत फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांना पाेलिसांनी धडा शिकविला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांच्यासह पथकाने केली.
जानजागृतीनंतरही वाहनधारक जाेरात...
मॉडीफाय सायलेन्सरचे फोटो काढून पोलिसांना कळविणाऱ्यांना सवलतीचे कुपन वाटप, ट्राफिक अँबेसिडर, रोटरी क्लब, सेवाभावी संस्थांच्या माध्यमाने जनजागृती, पथनाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, काही युवक नियमांचे उल्लंघन करत मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न वापरताना आढळून आले. अशावर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून ते जप्त केले जात आहे.
लातुरात तीन महिन्यांत १२५ सायलेन्सर जप्त...
लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून गत तीन महिन्यांत १२५ सायलेन्सर जप्त केले आहेत. या सायलेन्सरवर शुक्रवारी १२५ नियमबाह्य, मॉडीफाय सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न रोलर फिरवून चुराडा करण्यात आला. यापूर्वीही अशाच १५० सायलेन्सरवर राेलर फिरविण्यात आले हाेते.