लातूर : शिक्षकांची १२ वर्षांची झालेली सेवा आणि दोन वर्षांचा गोपनीय अहवाल समाधानकारक आल्याने जिल्ह्यातील १२८ सहशिक्षक, ८ मुख्याध्यापक आणि २६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात येणार आहे. निवड समितीच्या मान्यतेनुसार वरीष्ठ वेतनश्रेणी या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहे. तसेच यातील १ जानेवारी २०१६ नंतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यात यावी, अशा सुचनाही सीईओ अभिनव गोयल यांनी केल्या आहेत.
वरीष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या मुख्याध्यापकांमध्ये लातूर, देवणी, अहमदपूर तालुक्यातील एक तर औसा ३ आणि रेणापूर तालुक्यातील दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे. दरम्यान, २६ प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि १२८ सहशिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार आहे. संबधित गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या शिक्षक सवंर्गातील कर्मचाऱ्यांचे मुळ प्रमाणपत्र पडताळणी करुन चटोपाध्याय वरीष्ठ वेतनश्रेणीतील वेतन निश्चित करुन त्याची पडताळणी जि.प.च्या अर्थ विभागातील लेखाधिकारी यांच्याकडून करुन घ्यावयाची आहे.
तसेच वेतन पडताळणीमुळे अतिप्रदान, जादा अदाई झाल्यास सदरील रक्कम शिक्षकाच्या देय होणाऱ्या रकमेतून वसूल करावी, याबाबतचे हमीपत्र संबधितांकडून लेखी स्वरुपात घ्यावे अशा सुचनाही आदेशात करण्यात आल्या आहेत. तसेच वरीष्ठ वेतनश्रेणीमुळे होणाऱ्या फरकाची रक्कम, मासिक वेतनात समाविष्ठ होणारी रक्कम वेतन पडताळणी विभागाकडून पडताळणी झाल्याशिवाय अदा करु नये, अशा सुचनाही सीईओंनी आदेशात केल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये दोन शिक्षकांची नावे दुसऱ्यांदा आली आहेत.