राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील काेल्हेनगर भागात एका घरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिस पथकाने छापा मारला. यावेळी १३ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून राेख रक्कम, जुगाराचे साहित्य असा जवळपास ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केले आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील काेल्हेनगर भागात एका घरातच जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली. त्यांनी परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या पथकाला तातडीने छापा मारण्याचे आदेश दिले. यावेळी १३ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा जवळपास ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरात पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना जुगारी आढळून आले. छाप्यानंतर पाेलिसांच्या हातून निसटलेल्या फरार जुगाऱ्यांच्या मागावर पाेलिस पथक आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात जुगाऱ्याविराेधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४, ५, १२(अ) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी पथकाचा दाेन ठिकाणावर छापा...
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसर लातूरनजीकच्या मळवटी शिवारात आणि लातुरातील काेल्हेनगर भागात घरात सुरू असलेल्या जुगारावर एकाच वेळी विशेष पाेलिस पथकाने छापा मारला. मळवटी राेड येथील गुन्ह्यात बारा जुगाऱ्यांना पकडण्यात आले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यातही २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.