लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षक, मुख्याध्यापकांना पदोन्नतीची प्रतीक्षा लागून होती. अखेर बुधवारी १३२ जणांची पदोन्नती झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बढती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेत सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र गट ड आणि क मधील कर्मचाऱ्यांना बढती देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोमवारी सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, पंचायत अशा ५ विभागातील १० संवर्गातील शंभर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. शिक्षण विभागाचे प्रस्ताव उशिरा दाखल झाल्याने छाननी प्रक्रिया बुधवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक पदासाठी पात्र शिक्षकांचे लक्ष लागून होते.
बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या उपस्थितीत पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या दिवशीही रात्री ७.१५ वा.पर्यंत ही प्रक्रिया सुरु होती.
पुढील वर्षभरात ७८ पदे रिक्त...शिक्षण विभागात ऑगस्टअखेरपर्यंत ५४ पदे रिक्त झाली होती. आगामी ऑगस्टपर्यंत ७८ पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे एकूण १३२ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. पाणीपुरवठा, बांधकाम आणि अर्थ विभागात पदोन्नतीसाठी एकही पात्र उमेदवार नव्हता. यंदा एकूण २३२ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे.- नितीन दाताळ, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.