लातूर: मराठवाड्यासह अन्य भागामध्ये जोरदार पाऊस होत असला तरी मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत १५५.१ मी.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात केवळ १.३२१ दलघमी नव्याने पाण्याचा संचय झाला आहे. आता मांजरा प्रकल्पात ९५.७४० दलघमी इतका पाणीसाठा आहे.
१ जून ते १२ जुलै या कालावधीत त धरणात फक्त एक टक्का पाणी वाढले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वात मोठा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मांजरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दरवर्षी सप्टेबर किंवा ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसात भरतो. यावर्षीही प्रकल्प क्षेत्रात कमीच पाऊस झालेला आहे. त्यामुळे फक्त १.३२१ डलघमीने मांजरा प्रकल्पात वाढ झालेली आहे. आता धरणात ९५.७४० दलघमी पाणीसाठा आहे. २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात २७.४७ % जिवंत पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २५३ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र सारखा पाऊस झालेला नाही. सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यामध्ये असून जळकोट, देवणी, शिरूर अनंता, चाकूर आणि रेणापूर तालुक्यातील बऱ्यापैकी पाऊस आहे. त्यामुळे या तालुक्यात पेरण्या ८०% च्या पुढे झालेल्या आहेत. औसा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने बारा टक्क्यांपर्यंत पेरणी गेलेली आहे. दरम्यान लातूर शहराला मुबलक पाणी मिळण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या मांजरा प्रकल्प क्षेत्रावर १५१.१ मी.मी. पाऊस झाला आहे. या पावसावरच मांजरा प्रकल्पात एक टक्क्याने पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती प्रकल्प अभियांता सुरज निकम यांनी दिली.