लातूर : निलंगा येथील आडत बाजारातून रेशनचा तांदुळ भरून निघालेला एक टेम्पो लातूरच्या मिलमध्ये जात असल्याची माहिती मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी बुधवारी छत्रपती चौकात टेम्पो अडविला. त्यात रेशनच्या तांदळाचे १४१ कट्टे आढळून आल्याने पुरवठा विभागाला याची माहिती देण्यात आली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लातूर तहसीलचे पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार गणेश अंबर यांनी पंचनामा करून टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिला.
गरजू कुटुंबियांना रेशनकार्डवर दिले जाणाऱ्या स्वस्त धान्याला कोरोनानंतर पाय सुटले आहे. रेशनचा गहू, तांदुळ मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत आहे. बुधवारी पहाटे निलंगा येथील आडत बाजारातून रेशनचे तांदुळ घेऊन एक टेम्पो लातूरच्या दिशेने जात असल्याची माहिती शिवसेना (शिंटे गट) मागाासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना कांबळे यांना मिळाल्याने त्यांनी तत्काळ लातूर तहसील कार्यालयाला ही माहिती दिली. टेम्पो क्रमांक एमएच १४ डीबी २६९८ हा छत्रपती चौकात आला असता त्याची पाहणी करण्यात आली. त्यात रेशनचे तांदुळ असल्याचा संशय येताच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार गणेश अंबर, विवेकानंद चौक पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार गणेश अंबर यांनी सकाळी १०.३० वाजता पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रेशनचेच तांदुळ आहेत का याची तपासणी...रेशनचे तांदुळ घेऊन टेम्पो लातूरच्या मिलमध्ये जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती चौकात थांबलेल्या टेम्पाेचा पंचनामा बुधवारी सकाळी करण्यात आला. टेम्पोत १४१ कट्टे (जवळपास ५० किलाे वजनाचे) तांदुळ आढळून आले आहे. चालकाला विचारणा केली असता हे तांदुळ निलंगा येथील आडत बाजारातून आणले असून मिलला घेऊन जात असल्याची माहिती दिली आहे. हे तांदुळ रेशनचे असल्याचा संशय आल्याने टेम्पो विवेकानंद चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तपासात जे काही सत्य असेल ते समोर येईल. - गणेश अंबर, नायब तहसीलदार, (पुरवठा) लातूर.