लातूर : लातूर जिल्ह्यात गुरुवारी नवीन १५ रुग्ण आढळले असून, त्यात लातूर शहरातील ९, औसा तालुक्यातील सारोळा येथील १, उदगीर तालुक्यातील ३ व अहमदपूर तालुक्यातील २ अशा एकूण १५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असलेल्या एका ५५ वर्षीय बाधित रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांचा आलेख २६६ वर पोहोचला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १२८ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०४ निगेटिव्ह आले असून, १५ पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९ जणांचा अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला आहे. शिवाय, उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका ५५ वर्षीय बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये ९ लातूर शहरातील आहेत. त्यातील ४ वाल्मिकी नगर, माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एमआयडीसी येथील प्रत्येकी एकजण आहे. औसा तालुक्यातील सारोळा येथील १, उदगीर तालुक्यातील ३ तर अहमदपूर तालुक्यातील दोघांचा गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, गुरुवारी १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यात लातूर तालुक्यातील ७, उदगीर ४ आणि निलंगा येथील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत १८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.