यंदाचे प्रेवेंशन ऑफ डेंगू स्टार्ट फ्रॉम होम असे घोषवाक्य आहे. लातुरातील हिवताप कार्यालयाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. एडिस इजिप्ती डासाच्या मादीमार्फत डेंग्यूचा प्रसार होतो. डासांमध्ये डेंग्यू विषाणूची वाढ ही ८ ते १० दिवसांत होते. हे डास सहसा दिवसा मानवास चावतात. या डासांची उत्पत्ती ही पाण्याची टाकी, रांजण, फुटके टायर्स, वॉटर कुलर, नारळाच्या करवंट्या व भंगारामधील पाण्यात होत असते.
एकाकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी व सांधे दुखी, उलट्या होणे, दुसऱ्या दिवसांपासून तीव्र डोळे दुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, अंगावर पुरळ येणे, नाका- तोंडातून रक्त येणे, रुग्ण बेशुद्ध होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.
विभागातील डेंगू ताप उद्रेकाची संख्या लक्षात घेऊन आरोग्य कर्मचा-यांमार्फत दर महिन्यास प्रत्येक गावात किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतरच्या निष्कर्षानुसार डेंग्यू तापीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीस प्रतिबंधात्मक आणि रुग्ण आढळल्यास उपचारात्मक उपाययोजना राबविल्या जातात.
सन २०१९ मध्ये ७५४ रुग्ण...
लातूर विभागात सन २०१८ मध्ये ३ हजार २२० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. त्यात ७४३ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सन २०१९ मध्ये ३ हजार २०७ जणांच्या रक्तजल नमुन्यांत ७५४ रुग्ण आढळले होते. सन २०२० मध्ये ७७० रक्तजल नमुने घेण्यात आले. त्यात १५६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सन २०२१ मध्ये १५३ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असता त्यात २२ रुग्ण आढळून आले आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना...
जलद ताप सर्वेक्षण करणे, उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे, डास आळी असलेल्या पाणीसाठ्यात ॲबेट केले जाते. पाण्याची टाकी आठवड्यातून एकदा स्वच्छ करावी. पाणी साठ्यावर घट्ट झाकण बसवावे. गरजेप्रमाणे धूर फवारणी करावी, असे आवाहन हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय ढगे यांनी केले आहे.